नाशिक : कोरोनाने संत्रस्त केलेल्या वर्षापासून मिळणाऱ्या सुटकेच्या क्षणीदेखील त्याच्याच धास्तीमुळे आलेल्या निर्बंधांचे भान ठेवत नागरिकांनी नूतन वर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात केले. हॉटेल्समध्ये केवळ ११ वाजेपर्यंतच परवानगी असल्याने बहुतांश नागरिकांनी मध्यरात्रीनंतरचा क्षण आपापल्या घरातच साजरा केला. त्यात केवळ ज्या नागरिकांनी फार्म हाउसवर नववर्षाची रात्र साजरी केली त्यांनाच पूर्वीसारखा जल्लोष करता आला, अन्य नागरिकांनी नियंत्रित स्वरूपातच जल्लोष केला. दरम्यान, गुरुवारी दिवसभर नागरिकांनी नूतन वर्ष आरोग्यदायी जावो, अशा शब्दांत एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव केला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन-प्रशासनाने घातलेल्या निर्बंधांची माहिती नागरिकांना आधीपासूनच असल्याने बहुतांश नागरिकांनी यंदा बाहेर जाण्याचा विचार बदलून मावळत्या वर्षाची रात्र तसेच नवीन वर्षाच्या पहिल्या क्षणाचा आनंद घरातच लुटण्याचा निर्णय घेतला. काही मित्रमंडळींनी बंगले किंवा रोहाउसच्या गच्चीवरच न्यू ईअर सेलिब्रेशन केले. तर अनेक नागरिकांनी रस्त्यावरील बंदोबस्त पाहून वेळेच्या आत घरी परतण्यास प्राधान्य दिले. अनेक नागरिकांनी हॉटेल्समधून पार्सल्स मागवले तर काहींनी झोमॅटो आणि स्विगीच्या घरपोच सुविधांना प्राधान्य दिले. अनेक नागरिकांनी घरांमध्येच फास्ट फूड आणून मावळत्या वर्षाची रात्र टीव्हीवरील कार्यक्रम पाहात साजरी केली. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी काही हॉटेल्समध्ये कॅम्प फायरसह विशेष डिशेसचीही व्यवस्था करण्यात आली होती. अनेक हॉटेल्सनी आकर्षक सजावट, रोशणाई करतानाच पार्सलसाठीही होणारी गर्दी लक्षात घेऊन पार्सल यंत्रणा अधिक जलदपणे देण्याची जय्यत तयारी ठेवली होती. शुद्ध शाकाहारी हॉटेल्समध्ये पंजाबी, व्हेज चायनीज, महाराष्ट्रीय डिशेसना प्राधान्य दिले गेले. कुटुंबासाठी ओपन एअर रेस्टॉरंट, जोडपे, युवक-युवतींसाठी विविध हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये व्यवस्था करण्यात आली होती. शाकाहारी खवय्यांनी विविध प्रकारचे स्टार्टर, स्नॅक्स, इंडियन, कॉन्टीनेंटल व चायनीज जेवणाचा आनंद लुटण्यास प्राधान्य दिले. काहींनी मित्रमंडळींसमवेत तर काहींनी सहकुटुंब जेवणाचा आस्वाद घेत नवीन वर्षाचे स्वागत केले.
इन्फो
कॉलेजचा ग्रुप ते कॉलनीतील मित्र
या नववर्षाचे जल्लोषपूर्ण स्वागत करण्यासाठी शहरातील हॉटेल्स, कॅफे, रेस्टॉरंटसह रिसॉर्टमध्येही झगमगती रोशणाई करण्यात आली होती. हॉटेल्स आणि कॅफेमध्ये न्यू ईअर पार्टीचेदेखील आयोजन करण्यात आले होते. अशा या गेट टूगेदरसाठी मग कुणी कॉलेजचा ग्रुप, कुणी कार्यालयातील सहकाऱ्यांचा ग्रुप तर कुणी शालेय मित्रमंडळी, कुणी कॉलनीतील मित्रांच्या ग्रुपसमवेत न्यू ईअर पार्टी साजरी केली.
इन्फो
मध्यरात्रीपूर्वीच हॉटेल्समध्ये सामसूम
थर्टी फर्स्टचा सेलिब्रेशन मूड कॅश करण्यासाठी हॉटेल्समध्ये सर्व सज्जता ठेवण्यात आली होती. सर्व वयोगटातील ग्राहक, खवय्यांसाठी तसेच फॅमिली गेट टूगेदरसाठीही सज्जता होती. मात्र, ११च्या आत घरी पोहोचण्याच्या निर्बंधांमुळे नागरिकांनी साडेदहापासूनच हॉटेल्समधून काढता पाय घेतल्याने मध्यरात्रीच्या सुमारास हॉटेल्समध्ये सामसूमच होती.