देशातील विविध राज्यातील शेतकरी उत्पादकांना जनतेशी जोडणे व त्यांना आवश्यक ते व्यवस्थापकीय आधार देऊन बळकट करणे या दृष्टीकोनातून ईरमा या संस्थेतर्फे सदर स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेसाठी देशातील ९ राज्यांमधील १०० शेतकरी उत्पादक कंपनींनी सहभाग घेतला होता. यात महाराष्ट्र, गुजरात, तेलंगना, कर्नाटक, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, हिमाचल प्रदेश, दिल्ली, ओरिसा या राज्यातील कंपन्यांचा समावेश होता. यामधून अंतिम फेरीसाठी निवडण्यात आलेल्या २३ कंपन्यांमधून प्रथम, द्वितीय व तृतीय अशी निवड करण्यात आली. या स्पर्धेसाठी शेतकरी कंपन्यांकडून त्यांच्यापुढील पाच वर्षातील शेतकऱ्यांसाठी असलेल्या शाश्वत योजनांचा अहवाल मागविण्यात आला होता. या अहवालांची तज्ज्ञांद्वारे पडताळणी करून अंतिम विजेत्यांची निवड करण्यात आली. यामध्ये वावी येथील युवा मित्र व नाबार्ड यांच्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या ‘जामनदी खोरे शेतकरी उत्पादक कंपनीने’ बाजी मारत तृतीय क्रमांक मिळविला. यासाठी कंपनीला ३० हजार रुपये रोख व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सदर पारितोषिक एनसीडीईएक्सचे कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक आर. रामासेशन यांच्या हस्ते जामनदी शेतकरी उत्पादक कंपनीचे व्यवस्थापक किशोर चिने यांनी स्वीकारले. सदर स्पर्धेसाठी या कंपनीला युवा मित्रचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नॉब किसानचे व्यवस्थापकीय संचालक टी. व्यंकटाकृष्णा, नाबार्डचे उपमहाव्यवस्थापक एस पी. साठे, आयटीसीचे कार्यकारी उपाध्यक्ष एल. प्रभाकर आदि उपस्थित होते.
जामनदी शेतकरी उत्पादक कंपनीचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 6:02 PM