नाशिक : आदिवासी नृत्याला ढोलताशांची साथ आणि चौकाचौकांत होणारे स्वागत, औक्षण आणि रस्त्याच्या दुतर्फा होणाऱ्या पुष्पवर्षावात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या ‘जनआशीर्वाद यात्रे’ला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. पाथर्डी फाट्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सुरू झालेल्या या यात्रेची सांगता काळाराम मंदिरासमोर करण्यात आली.
पालघर येथून सुरू झालेल्या या जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील पाच लोकसभा मतदारसंघांच्या समस्या जाणून घेतल्या. केंद्र सरकारच्या माध्यमातून या समस्या सोडविण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करणार असून, सामान्यांच्या प्रश्न दिल्ली दरबारी सोडविण्यासाठी काम करणार असल्याची ग्वाही केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले. जनआशीर्वादाच्या माध्यमातून सामान्यांशी तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे. त्यांच्या समस्या समजावून घेतल्या आहेत. जनआशीर्वाद यात्रा ही जनतेला समर्पित असल्याने त्यांच्या समस्या निश्चितपणे सुटतील, असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा शुभारंभ सायंकाळी पाथर्डी फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाला. पाथर्डी फाटा येथून निघालेली जनआशीर्वाद यात्रा उत्तमनगर, पवननगर, त्रिमूर्ती चौक, उंटवाडीमार्गे कॅनडा कॉर्नर, सीबीएस येथून रविवार कारंजामार्गे पंचवटी कारंजा येथे पोहोचली. एकूण १२ किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत डॉ. पवार यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा समारोप काळाराम मंदिर येथे झाला. या यात्रेदरम्यान, नाशिकचे प्रभारी माजी मंत्री जयकुमार रावल, माजी मंत्री सदाभाऊ खोत, प्रदेश सरचिटणीस तथा आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदर ॲड. राहुल ढिकले, शहराध्यक्ष गिरीश पालवे, लक्ष्मण सावजी, महेश हिरे, नगरसेविका हिमगौरी आडके आदी उपस्थित होते.
इन्फो
रांगोळी, फुगड्या, औक्षणाने स्वागत
पाथर्डी फाटा येथून सुरू झालेल्या जनआशीर्वाद यात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी रांगोळी, सडा टाकण्यात आला होता. चौकाचौकांत सुवासिनींनी डॉ. भारती पवार यांचे औक्षण करीत नाशिककरांच्या प्रेमाचे दर्शन घडवले. रस्त्यांच्या कडेला उभ्या असलेल्या, दुतर्फा गॅलरींमध्ये उभे राहून कौतुकाने पुष्पवर्षाव करणाऱ्या जनतेला अभिवादन करत यात्रा पार पडली. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम, जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा दिल्या. ढोलताशाच्या गजरात निघालेल्या जनआशीर्वाद यात्रेचे ठिकठिकाणी भव्य स्वरुपात स्वागत करण्यात आले. उत्तमनगर, पवननगर, त्रिमूर्ती चौक या परिसरात यात्रेचा जल्लोष मोठा होता. पंचवटी कारंजा येथे यात्रेच्या स्वागतासाठी मोठी गर्दी झाली होती. यात्रेच्या मार्गावर ठरावीक अंतराने वेगवेगळ्या पध्दतीने स्वागत करण्यात आले. राष्ट्रभक्तीपर गीते आणि आदिवासी नृत्यामुळे जनआशीर्वाद यात्रा नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.