दिंडोरी : पंधरा दिवसांपूर्वी तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला आणि जनता हादरली. मात्र, स्थानिक यंत्रणेला विश्वासात घेत प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाय आखली. तीन ते सात दिवसांपर्यंत जनता कर्फ्यूचे काटेकोर पालन करत अत्यावश्यक वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. सुमारे १५०० नागरिकांना सेल्फ कॉरण्टाइन करण्यात आले. बाहेरुन येणाऱ्यांवर कडक नजर ठेवली गेली आणि या साºयाचा एकत्रित परिणाम म्हणून नवीन रुग्ण दाखल तर झालाच नाही शिवाय बाधित सर्व नऊ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.तालुक्यात ८ मे रोजी पहिला बाधित आढळला होता. त्यानंतर लागोपाठ नऊ रु ग्ण आढळल्याने चिंता वाढली. यंत्रणेने सहवासातील अति जोखमीच्या व्यक्तींना विलगीकरण कक्षात ठेवले. रु ग्णसंख्या वाढत असल्याने नागरिकांनीही जनता कर्फ्यूचे स्वयंस्फूर्तीने पालन केले. आपत्ती व्यवस्थापन समितीसह अधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक यंत्रणा कार्यान्वित केली. बाहेरून आलेल्या नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आले. तालुक्यातून भाजीपाला नाशिकसह मुंबईत जात असल्याने धोका वाढला होता. त्यातच तालुक्यातील पोलिसाला मालेगाव कर्तव्य बजावताना संसर्ग झाल्याने त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. पंधरा दिवसात बाधितांची संख्या ९ वर जाऊन पोहोचली परंतु, आता नवीन रुग्ण दाखल न होण्याबरोबरच हे सर्व नऊ जण कोरोनामुक्त झाल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. तालुक्यात ८ ते १५ मे या कालावधीत हे नऊ रुग्ण बाधित झाल्याचे आढळून आले होते. मात्र, १५ मे नंतर तालुक्यात एकही नवा बाधित रुग्ण आढळून आलेला नाही.----------------विलगीकरण कक्ष रिकामादिंडोरी येथे कोव्हिड हेल्थ सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. येथे तालुका वैद्यकीय अधीकारी डॉ. सुजय कोशिरे, ग्रामीण रु ग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ विलास पाटील यांच्या पथकाचे निगराणी खाली पाच तर नाशिकला चार रु ग्ण उपचार घेत होते. हे सर्व रु ग्ण ठणठणीत बरे होत त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. आता दिंडोरीत कुणीही विलीगीकरण कक्षात नाही.------------------------प्रशासकीय यंत्रणेतील विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी एकमेकात समन्वय ठेवत आपली जबाबदारी चोखपणे पार पाडत आहेत. तालुक्यातील जनतेचेही चांगले सहकार्य मिळाले आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटावर मात करत आहोत . यापुढेही तालुक्यात प्रार्दुभाव होऊ नये यासाठी शासकीय यंत्रणा काम करत आहे . जनतेने बाजारपेठ सुरु झाल्या असल्या तरी आवश्यक ती काळजी घेणे व नियम पाळणे आवश्यक आहे- डॉ संदीप आहेर, प्रांताधिकारी दिंडोरी-पेठ
जनता कर्फ्यूने दिंडोरी तालुक्याला तारले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 9:40 PM