तब्बल ३५ वर्षे मालेगावकरांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे, राज्याचे माजी मंत्री, विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते व मनपाचे प्रथम महापौर समाजवादी दिवंगत नेते साथी निहाल अहमद यांनी जनता दल पक्ष तळागाळात रूजवला. जनतेनेही जनता दलाला वारंवार संधी दिली. निहाल अहमद यांच्या नंतर नगरसेवक बुलंद एकबाल यांनी पक्षाची संघटनात्मक बांधणी केली होती. मात्र त्यांचेही निधन झाले. पक्षाला नेतृत्व नसल्याने कार्यकर्ते सैरभैर झाले हाेते. जनता दल बॅकफुटवर जाऊन काँग्रेस व धर्मगुरू मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी संधी साधत वर्चस्व प्रस्थापित केले. विधानसभेच्या निवडणुकीत जनता दलाने सक्रिय सहभाग नोंदवत मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांना निवडून आणले. महापालिकेच्या निवडणुकीतही जनता दलाचे सात नगरसेवक निवडून गेले आहेत. महापालिकेत जनता दलाच्या शान-ए-हिंद यांना विरोधी पक्षनेतेपद मिळाले. त्यांनी या पदाचा योग्य वापर करत शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
---------------------
काँग्रेस, एमआयएमपुढे डोकेदुखी
सत्ताधारी काँग्रेस व सेनेला सभागृहात कोंडीत पकडले. जनताचे सचिव मुस्तकिम डिग्नीटी यांनीही काँग्रेसवर आरोप-प्रत्यारोप केले. परिणामी जनता दलाने महापालिकेच्या राजकारणात कमबॅक करत आपले वर्चस्व दाखवून दिले आहे. जनता दलाच्या सभांनाही गर्दी होत आहे. जनता दलाचा वाढता प्रभाव एमआयएम व काँग्रेसपुढे डोकेदुखी ठरू पाहत आहे. आगामी महापालिका निवडणुकीत जनतेपुढे तिसरा पर्याय म्हणून तो पुढे येत आहे.