लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी नाशिकमधून सुकाणू समितीच्या माध्यमातून उभा राहिलेल्या लढ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यव्यापी जनजागरण यात्रेचे आयोजन करण्यात आले असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पुढील टप्प्याची सुरुवातही नाशिकमधूनच होणार असल्याने पुन्हा एकदा संपूर्ण राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष नाशिक येथील तूपसाखरे लॉन्स येथे होणाऱ्या शेतकरी कर्जमुक्ती एल्गार सभेकडे लागले आहे. शेतकरी एल्गार सभेनंतर सुकाणू समितीतर्फे राज्यव्यापी जनजागरण यात्रा सुरू करण्यात येणार असून, सोमवारी (दि.१०) राज्यभरातील सर्व शेतकरी संघटना या जनजागरण यात्रेत सहभागी होणार आहेत. सुकाणू समिती संपूर्ण राज्याचा दौरा करीत राज्यभरात १४ ठिकाणी जाहीर सभांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जनजागृती करणार आहे. सुकाणू समितीकडून राज्य सरकारने केलेली कर्जमाफीची घोषणा फसवी असल्याचे सांगितले जात असून, या फसवणुकीविरोधात जनजागृती यात्रेतून शेतकऱ्यांना वास्तविकतेविषयी अवगत करण्यात येणार आहे. शेतकरी संप व आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. प्रत्यक्षात मात्र अत्यंत जाचक अटी लावण्यात आल्या. केवळ थकबाकीदार शेतकऱ्यांचेच कर्जमाफी करण्याची भूमिका घेण्यात आली. कर्जमाफी रकमेसाठी दीड लाखांची मर्यादा लावण्यात आली. थकितसाठी ३० जून २०१७ ची अट घालण्यात आली. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्यात आले. पॉलीहाउस, सिंचन, शेडनेट, इमूपालन आदींसाठी घेतलेल्या कर्जांना कर्जमाफीतून वगळण्यात आले. चुकीच्या व फसवणूक करणाऱ्या आकड्यांच्या आधारे जनतेची दिशाभूल करण्यात आली. वारंवार शासनादेश काढून व भूमिका बदलून कर्जमाफीचा पोरखेळ केला गेला. शेतकऱ्यांना जखमांवर मीठ चोळणारी विधाने करण्यात आल्याचे आरोप शेतकरी आंदोलनातील सुकाणू समितीच्या सदस्यांनी केले असून, जनजागरण यात्रेत शेतकऱ्यांच्या मनातील या भावना समजून घेऊन लढ्याची पुढील रणनीती ठरविली जाणार असल्याची माहिती सुकाणू समितीचे समन्वयक अजित नवले यांनी दिली.
सुकाणू समितीची आजपासून जनजागरण यात्रा
By admin | Published: July 10, 2017 1:06 AM