जानोरी येथून दि. १४ डिसेंबर रोजी २४ भाविक सायकलीने पंढरपूर यात्रेला गेले होते. दि. १८ रोजी ते घरी परतल्यावर त्यांना ताप व खोकल्याचे लक्षणे दिसू लागल्याने त्यांनी खासगी प्रयोगशाळेत स्वॅब चाचणी केली असता त्यातील १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. दरम्यान, २५ ग्रामस्थांचे अहवालदेखील पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे गावकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दोन दिवसांचा बंद पाळला होता. ही वस्तुस्थिती असताना पंढरपूरला गेलेले सर्व २४ जण बाधित झाले असून गावात १३० ते १४० रुग्ण असल्याने आठ दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याच्या अफवा सोशल मिडियावर फिरु लागल्याने याचा गावकऱ्यांना मनस्ताप झाला व गावातसुद्धा भीतीचे वातावरण पसरले होते. आता पंढरपूरहून परतलेले व बाधित निघालेल्या रुग्णांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले असून त्यातील १० ते १२ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. गावातील अन्य दहा ते बारा रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून उर्वरित रुग्णांची परिस्थिती सुधारत असल्याने ते होम क्वारण्टाईन झाले आहेत.
कोरोनापेक्षा अफवांमुळेच जानोरीकर बेजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 4:54 PM
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी गावात केवळ ४१ जण कोरोना बाधित असताना समाजमाध्यमांद्वारे पसरविण्यात आलेल्या १४० रुग्ण असल्याच्या व गाव आठ दिवस बंद ठेवल्याच्या अफवांमुळे गावकऱ्यांना नाहक मनस्ताप सोसावा लागत आहे. वस्तुत: गाव स्वयंस्फूर्तीने फक्त दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले असून शनिवार (दि. २६) पासून व्यवहार पूर्ववत होणार असल्याने ग्रामस्थांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन उपसरपंच गणेश तिडके यांनी केले आहे.
ठळक मुद्देगाव दोन दिवस बंद : १४० नव्हे; ४१ रुग्ण