नाशिक : पेठ तालुक्यातील हरसूल जवळच्या घोटविहिरा या आदिवासी पाड्यावर कोरोनाच्या काळात आवश्यक असणाऱ्या विविध उपयुक्त साहित्याचे वाटप करुन लसीकरणाबाबत जनप्रबोधन करण्यात आले. या उपक्रमासाठी ग्रीन केअर संस्थेच्या अध्यक्षा पौर्णिमा आठवले, सचिव सलीम शेख, आदिवासी वारली चित्रशैली अभ्यासक संजय देवधर उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेजवळ मारुती मंदिर सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिक्षक सुरेश सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे नेटके नियोजन, प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. यावेळी ५० महिलांना पांघरायची फडकी, १०० युवतींना स्कार्फ, विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी लिनोवो कंपनीचे तीन टॅब, डॉ. दिव्या सातळे यांच्यातर्फे प्रथमोपचार पेट्या व अत्यावश्यक औषधे, संजय देवधर यांच्या वारली आर्ट फाउंडेशनच्या माध्यमातून मुलांच्या कलाकौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी कलर पेस्टल्स,जलरंग, पोस्टर कलर्स, कलर पेन्सिल्स असे साहित्य वितरित करण्यात आले. कोविडच्या नियमावलीचे काटेकोर पालन करीत प्रत्येक गटातील दोन जणांना व्यासपीठावर प्रातिनिधिक स्वरूपात वस्तू प्रदान करण्यात आल्या. पौर्णिमा आठवले यांनी मनोगतात ग्रीन केअर संस्थेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. लवकरच महिलांसाठी गोधडी निर्मिती स्पर्धा व विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व सामान्यज्ञान स्पर्धा घेण्यात येईल अशी घोषणाही त्यांनी केली. कावळ्याचा पाडा येथील शिक्षक धर्मराज मोरे यांनी सर्वांचे स्वागत केले. मनोगतात आठवणी सांगून ग्रामस्थांचे कौतुकही केले. कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भागवत चौधरी, आशा वर्कर मनिषा चौधरी, अंगणवाडी सेविका तलाबाई चौधरी, नंदाबाई, सुमनताई, सीताबाई व नागरिक उपस्थित होते. गावकऱ्यांच्या वतीने वसंत चौधरी यांनी समाधान व्यक्त करून आभार मानले.