लासलगाव : शेतमालाचे रोख पैसे देण्याच्या वादातून लासलगाव व निफाड उपबाजार समितीत कांदा लिलाव गुरुवारपासून (दि.२०) बंद केल्याने कोट्यवधींचे व्यवहार ठप्प झाले आहेत. दरम्यान, शुक्रवार, दि. २१ पासून धान्य लिलाव सुरू करण्यात येणार आहे.नोटाबंदी झाल्यानंतर पणन संचालनालय व सहकार खात्याच्या आदेशानुसार चलन पुरवठा सुरळीत होईपर्यंत लासलगावसह सर्व बाजार समित्यांनी शेतमालाचा परतावा धनादेश, एनईएफटी वा आरटीजीएसद्वारे अदा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार बाजार समितीच्या लासलगाव मुख्य व निफाड उपबाजार आवारावर १८ नोव्हेंबर २०१६ पासून शेतमालाची धनादेशाद्वारे रक्कम अदा करण्यात येत आहे. मात्र व्यापारीवर्गाने दिलेले धनादेश संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग होण्यास किमान १५ दिवस ते महिन्याभराचा कालावधी लागत आहे. परंतु रिझर्व्ह बँकेने दि. १३ मार्च, २०१७ पासून रोख रक्कम काढण्याची मर्यादा शिथिल करून चलन पुरवठा सुरळीत केल्याने शेतमाल विक्री केल्यानंतर रोख अथवा एनईएफटीद्वारे शेतमालाची रक्कम अदा करावी, अशी मागणी शेतकऱ्यांसह शेतकरी संघटनेकडून बाजार समितीकडे वारंवार होत आहे.बाजार समिती कायद्यानुसार शेतमाल वजनमापानंतर लगेच मालविक्रीची रक्कम अदा करण्याची तरतूद असल्याने शेतकरी हिताच्या दृष्टीने बाजार समितीने पहिल्यांदा दि. १३ मार्चपासून व नंतर दि. १ एप्रिलपासून शेतमाल विक्र ीची रक्कम रोख अथवा एनईएफटीद्वारे अदा करण्याच्या संबंधित व्यापारीवर्गास सूचना दिल्या होत्या. (वार्ताहर)
लासलगावी कोट्यवधींचे व्यवहार ठप्प
By admin | Published: April 21, 2017 12:42 AM