डांगसौंदाणे : येथील रहिवासी मराठा बटालियनचा लष्करी जवान विजय बापूजी सोनवणे (३३) यांचा आसाममधील तेजपूर सेक्टर येथे कर्तव्यावर असताना मृत्यू झाला. लष्करी जवान विजय सोनवणे आसाम येथील मराठा बटालियनमध्ये तेजपूर भागात कर्तव्यावर असताना रविवारी मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त सोमवारी दुपारी डांगसौंदाणे परिसरात येऊन धडकले. हे वृत्त पसरल्याने गावातील मित्र व नातेवाइकांनी ग्रामपंचायत आवारात मोठी गर्दी केली. विजय यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी, मुलगा व मोठा भाऊ असा परिवार आहे. १४ ते १५ वर्षांपासून लष्करी सेवेत असलेले विजय यांनी लेह, लडाखसह जम्मू-काश्मीर भागात कर्तव्य बजावले होते. शेतकरी कुटुंबात जन्मलेले विजय १२वी नंतर लष्करी सेवेत दाखल झाले होते. मनमिळाऊ व सतत हसतमुख असलेले विजय मागील महिन्यात दिवाळी सणासाठी आपल्या गावी आले होते. सुटीचा कालावधी संपून डिसेंबरच्या सुरवातीलाच आपल्या कर्तव्यावर गेले होते. रविवारी मध्यरात्री आसाम च्या तेजपुर सेक्टरमध्ये गार्ड ड्युटीवर असताना सोनवणे यांचा मृत्यू झाला. असल्याचा संदेश मिळाल्यानंतर डांगसौंदाणे सह पंचक्र ोशीत विजयच्या आठवणीना उजाळा देण्यात येत होता. विजय यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगी, एक मुलगा व मोठा भाऊ असा परिवार आहे. दरम्यान मंगळवारी (दि.१८) रोज़ी सायंकाळी उशिरा पर्यत विजयचे पार्थिव देह डांगसौंदाने येथे येणार असल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले.
डांगसौंदाणे येथील जवानाचा तेजपूर येथे मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 1:53 AM