नाशिक : देवळाली कॅम्पमधील लष्कराच्या तोफखाना विभागात कार्यरत असलेल्या जवानाने आत्महत्त्या केल्याची घटना गुरूवारी रात्री उशिरा उघडकीस आली. ३५ वर्षीय डी. एस. रॉय मॅथ्युज याने हेग लाईन येथील बॅरेकला स्वत:ला टांगून घेत आत्महत्त्या केली. या प्रकाराची लष्कराच्या वरीष्ठ अधिकारी तसे केंद्रीय गृहमंत्रालयामार्फत चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रिय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांनी शुक्रवारी नाशकात दिली़देवळाली कॅम्प येथील जुन्या बराकीत गुरुवारी (दि़२) रॉय मॅथ्यूचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला होता. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. शुक्रवारी नाशकात आयोजित डिजीधन मेळाव्यानंतर मंत्री डॉ़ भामरे यांनी या संदर्भात पत्रकारांशी बोलताना सांगितले, लष्करी जवानाची आत्महत्त्या ही दुर्दैवी बाब आहे़ २४ फेब्रुवारीपासून तो बेपत्ता होता़ आत्महत्त्येपुर्वी त्याने लष्करातील अधिकाऱ्यांकडून सैनिकाला दिल्या जाणाऱ्या अपमानास्पद वागणुकीचे स्टिंग करून ते सोशल साईटवर टाकल्याची माहिती मिळाली आहे़ त्यानुसार स्टींग नेमके काय होते? या त्रासाबाबत त्याने वरीष्ठांकडे तक्रार का केली नाही? आत्महत्त्येचा निर्णय का घेतला याच्या चौकशीतून सत्य शोधले जाणार आहे़ यामध्ये दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे भामरे यांनी सांगितले़जवान रॉय मॅथ्यु याने व्हिडीओतून वरीष्ठ अधिकारी सैनिकांना कसे घरगड्यासारखे राबवून घेतात ? त्यामध्ये मुलांना शाळेत सोडणे, कुत्र्यांना फिरविणे, भांडी घासणे अशी कामे करून घेतली जात असल्याचे चित्रीकरण करून सैनिकांच्या व्यथेला वाचा फोडली होती़ मॅथ्युचा हा व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल झाल्याने त्याच्या आत्महत्त्येचा मुद्दा तापत आहे. या व्हिडीओमुळे निर्माण झालेल्या वादाशी मॅथ्युचा काही संबंध आहे का? याचा तपास केला जातो असल्याचेही सांगण्यात येत आहे. दरम्यान जवान रॉयचा मोबाईल व मल्याळम भाषेतील त्याची डायरी पोलिसांना मिळाली असून त्यामध्ये तो सर्वांची माफी मागत असल्याचे वृत्त आहे़ या डायरीचे भाषांतर करण्यात येणार असून आणखी काही भयानक वास्तव समोर येण्याची शक्यता आहे़ तर मोबाईल तांत्रिक शाखेकडे चौकशीसाठी देण्यात आला असून यातील फुटेल व व्हिडीओबाबत चौकशी केली जाणार आहे़ मॅथ्युज मूळचा केरळ येथील रहिवासी असून, त्याच्या आत्महत्त्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. परंतु तो गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असल्याचे समजते. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस स्थानकात सुभेदार गोपालसिंह यांनी फिर्याद दिली आहे.(प्रतिनिधी)
जवानाच्या मृत्यूचे गूढ कायम
By admin | Published: March 04, 2017 1:55 AM