नाशिक - नाशिक शहरासह जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडीचा धरणसाठा चक्क दुप्पट झाला. जायकवाडी ६५.६१ टक्के भरले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील जायकवाडी धरण अर्थात नाथसागर जलाशयात सध्या १ हजार ४२४.४०८ दशलक्षघनमीटर इतका जलसाठा झाला आहे. शनिवारपर्यंत (दि.१६) ४९ हजार ९०४ क्युसेक इतकी पुरपाण्याची आवक झाली आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातून सर्वाधिक पाणी जायकवाडीत पोहचले.
हवामान खात्याकडून नाशिक जिल्ह्याला मागील आठवड्यात ‘रेड ॲलर्ट’ देण्यात आला होता. जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. इगतपुरी, सुरगाणा, पेठ आणि त्र्यंबकेश्वर या चार तालुक्यांमधील जोरदार पाऊस पडला. सुरगाण्यात आतापर्यंत १ हजार २७८ मिमी. तर पेठमध्ये १ हजार ५२९ मिमी, त्र्यंबकेश्वरमध्ये ९७६ मिमी आणि इगतपुरीत ७८३ मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. यामुळे दारणा, गंगापुर, कडवा, आळंदी या धरणांचा विसर्ग मोठ्या प्रमाणात करण्यात आला. हे सर्व पाणी नांदुरमध्यमेश्वर बंधाऱ्यावरून पुढे थेट जायकवाडीत जात आहेत. अजुनही दारणा, गंगापुर, कडवा या धरणांमधून विसर्ग काही प्रमाणात सुरुच आहे. नांदुरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून पुढे रविवारी (दि.१७) २९ हजार ६६७ क्युसेक इतका विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरू आहे.
८ जुलैपासून २ हजार १६८ क्युसेकने सुरू झालेली पुरपाण्याची आवक१ लाख ५ हजारापर्यंत जाऊन पोहचली आहे. या आवकमध्ये अजुनही भर पडतच आहे. नाशिकमधून मोठ्या प्रमाणात जायकवाडीत आवक झाली आहे. नांदुरमध्यमेश्वरमधून आतापर्यंत २६ हजार ५८१ दलघफू इतके पाणी गोदापात्रात वाहून गेले आहे. यामुळे धरणसाठ्यात वाढ होत असून मराठवाड्याची पाण्याची चिंता मिटणार आहे. जायकवाडीच्या पाणीसाठ्यात होणारी वाढ नाशिकच्या पर्जन्यमानावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. नाशिकला मुसळधार पाऊस झाल्यास जायकवाडीच्या दिशेने गोदापात्रातून पाण्याचा विसर्ग केला जातो. यामुळे मराठवाड्यातील नागरिकदेखील नाशिकला जोरदार पाऊस पडो, अशीच अपेक्षा बाळगून असतात.
१७ दिवसांत धरणांमधून सोडलेला विसर्ग (क्युसेकमध्ये)
दारणा- ७० हजार ५९२गंगापुर- ४४ हजर ७६२कडवा- २० हजार ३९२आळंदी- ३हजार ८१३नांदुरमध्यमेश्वर- ३ लाख ७ हजार ५३७