नाशिक : परतीच्या पावसाने ओढ दिल्याने राज्यातील काही ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ त्यामुळे मराठवाड्याची तहान भागविणाऱ्या जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय हा १५ आॅक्टोबरनंतरच्या आढावा बैठकीनंतर घेतला जाणार असून, नियमानुसार जायकवाडीसाठी पाणी सोडले जाणार असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी (दि़१४) पत्रकारांशी बोलताना दिली़
दिंडोरीरोडवर आर्थिकदृष्ट्या मागास मराठा समाजाच्या मुला-मुलींसाठी तयार करण्यात आलेल्या डॉ़ पंजाबराव देशमुख वसतिगृहाच्या उद्घाटनानंतर महाजन बोलत होते़ जायकवाडी धरणात यंदा ६५ टक्के इतका साठा असून, मेंढीगिरी समितीच्या शिफारसीनुसार नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातून पाणी सोडावे लागण्याची शक्यता असून, नेमके किती व केव्हा पाणी सोडणार या पत्रकारांच्या प्रश्नावर ते बोलत होते़ त्यांनी सांगितले की, १५ आॅक्टोबरनंतर धरणांची स्थिती, त्यातील उपयुक्त जलसाठा, पाण्याची आवश्यकता या बाबींचा अभ्यास करून आढावा बैठकीनंतर पाणी सोडण्याचा निर्णय घेऊ़ तसेच नियमानुसार जायकवाडीसाठी पाणी सोडले जाणार असल्याचे ते म्हणाले़
जायकवाडी धरण ६५ टक्क्यांपेक्षा कमी भरल्यास समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार उर्ध्व गोदावरी खोºयातील गंगापूर-दारणा-पालखेड-प्रवरा -मुळा धरण समूहातून मेंढीगिरी समितीच्या सूचनेनुसार पाणी सोडण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. यंदाच्या वर्षी जायकवाडी धरणाचा एकूण उपयुक्त पाणी साठा ७६ टीएमसी म्हणजे शंभर टक्के इतका आहे. खरीप हंगामाचा वापर आणि आजचा पाणी साठा ४४ टीएमसी झाला आहे. त्यामुळे यावर्षी उर्ध्व गोदावरी खोºयातून जायकवाडी धरणासाठी साधारणपणे ६ टीएमसी पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे.
जायकवाडीसाठी पाणी सोडण्याच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा नाशिक-अहमदनगर विरुद्ध मराठवाडा असा पाणीवाद होण्याची शक्यता आहे़ दरम्यान, पाणी सोडल्यानंतर नाशिक व नगरकरांवर पाणीकपातीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे़