देवळाली कॅम्प : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष व गुलालाची उधळण करत देवळाली कॅम्प परिसरात लाडक्या गणरायाचे भक्तिभावात विसर्जन करण्यात आले.देवळाली कॅम्प, लॅमरोड आदि आजूबाजूच्या भागातील घरगुती व छोट्या-मोठ्या गणेश मंडळांनी रविवारी सकाळपासून ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष करीत संसरी येथील दारणा नदीपात्रात श्री गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. पर्यावरणाचा होणारा ऱ्हास व जलप्रदूषण टाळण्यासाठी रोटरी, इनरव्हील क्लब, रोटरी ज्येष्ठ नागरिक संघ, दारणा बचाव कृती समिती आदि संस्था-मंडळांच्या संयुक्त विद्यमाने दारणा तीरावर मूर्ती व निर्माल्य संकलन करण्यात येत होते. दिवसभरात संसरी येथे सुमारे २ हजार गणेशमूर्ती व ८ ते १० टन निर्माल्य संकलित करण्यात आले. यावेळी नगरसेविका आशा गोडसे, रोटरी क्लबचे अध्यक्ष मनोज कल्याणकर, मनीषा दोशी, सुनीता आडके, भैरवी बक्षी, नंदा भुतडा, उज्ज्वला देशमुख, संगीता नानेगावकर, संगीता जाधव, नंदकिशोर भुतडा, प्रा. विक्रम काकुळते आदि उपस्थित होते.मिरवणूक उत्साहात देवळालीचा राजा म्हणून प्रसिद्ध ंअसलेला गवळीवाडा मित्रमंडळाचा गणपती, क्रांती मित्रमंडळ, कोठारी गणेश प्रतिष्ठान, कॅथे कॉलनी मित्रमंडळ, पाषाण तरुण मित्रमंडळ, सहाव्या गल्लीचा राजा, तरुण मित्रमंडळ, विजय अमरदीप आदिंसह लहान-मोठ्या मंडळांनी आपापल्या परिसरातून संसरी दारणा नदीपर्यंत डीजे, ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पाचा जयजयकार करत मिरवणूक काढून लाडक्या गणरायाचे विसर्जन केले. यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप, छावणीचे उपाध्यक्ष सचिन ठाकरे, चंद्रकांत गोडसे, भगवान कटारिया, भाऊसाहेब धिवरे आदिंसह नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंडळांच्या मिरवणुकीस भेटी दिल्या. दारणा तीरावर गणरायाच्या विसर्जनासाठी उपसरपंच संतोष गोडसे, चंद्रकांत गोडसे, रमेश गिते, विष्णू ठाकरे, संजय गिते, सुसा आचारी, किरण गोसावी, अनिल गोडसे, विष्णू इल्हे आदि विशेष परिश्रम घेत होते. सहायक पोलीस आयुक्त रवींद्र वाडेकर, पोलीस निरीक्षक राजेश आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (वार्ताहर)
देवळाली कॅम्पला गणराजाचा जय जयकार
By admin | Published: September 28, 2015 10:47 PM