नाशिक : मुंबई नाका-काठेगल्ली, वडाळा-पाथर्डीरोड ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या ‘नागजी चौफुली’वर काही दिवसांपूर्वीच सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली; मात्र येथील गतिरोधक ‘जैसे-थे’ असल्यामुळे नागरिकांना सिग्नल पाळताना ‘दणका’ सहन करावा लागत होता. तसेच अपघातांना निमंत्रण मिळत होते. याबाबत रविवारी (दि.२७) ‘लोकमत’ मधून सचित्र वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. त्यानंतर पालिका प्रशासनाने खडबडून जागे होत चौफुलीवरील चार ठिकाणी टाकण्यात आलेले गतिरोधक जेसीबीने उद््ध्वस्त केले.चौफुलीच्या चारही रस्त्यांवर गतिरोधक (रम्बलर) पालिकेने टाकले. डांबरी गतिरोधक टाकताना वाहतुकीच्या नियमांचे कु ठलीही अंमलबजावणी करण्यात आली नव्हती. केवळ वाहनांच्या वेगाला अटकाव व्हावा, म्हणून अवाढव्य एकापाठोपाठ तीन गतिरोधक टाकू न वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. अरुंद चौकात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. बेट हटवून चौफुलीवर सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली; मात्र ही सिग्नल यंत्रणा अनेक महिने केवळ शोभेपुरतीच होती. तक्रारी वाढल्यानंतर सिग्नलचे ‘दिवे’ लागले; मात्र गतिरोधकांमुळे अपघातांना निमंत्रण मिळत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात होता. याबाबत ‘लोकमत’मधून वृत्ताद्वारे संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. पालिकेचे अधिकारी-कर्मचारी वर्गाने तत्काळ सोमवारी (दि.२८) दुपारी जाऊन गतिरोधक हटविल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)
‘त्या’ गतिरोधकांवर फिरला जेसीबी
By admin | Published: December 28, 2015 11:47 PM