पाथर्डी फाटा : वासननगर येथील एका हॉटेलमध्ये पार्किंगसाठी जेसीबीच्या सहाय्याने जागा तयार करताना जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया गेले. पाण्याच्या समस्येने हैराण असलेल्या वासननगरवासीयांना या प्रकारामुळे कमी दाबाने पाणी मिळाल्याने स्थानिक नागरिक व महिलांनी संताप व्यक्त केला. शुक्रवार (दि.२७) रोजी हॉटेलजवळून जाणाऱ्या रस्त्याच्या दरम्यान असलेले मातीचे ढीग जेसीबीच्या सहाय्याने हटवून सपाटीकरणाचे काम सुरू असताना येथून जाणारी जलवाहिनी फुटली. सकाळी दहा वाजेच्या सुमारास फुटल्याने जलवाहिनीतून हजारो लिटर पाणी वाया गेले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर सरचिटणीस रवींद्र गामणे यांनी हा प्रकार मनपाच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना कळविला. विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुपारी बारा वाजेच्या सुमारास पाणीपुरवठा बंद करून जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले. तोपर्यंत हजारो लिटर पाणी वाहून गेले होते. परिणामी वासननगरच्या पूर्वेकडील भागास कमी दाबाने व कमी पाणी मिळाल्याने नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. संबंधित प्रकाराबद्दल हॉटेल व्यवस्थापनावर कारवाई करण्याची मागणी रवींद्र गामणे, साईनाथ सोनवणे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)वासननगर येथे एका हॉटेलच्या शेजारी जेसीबीच्या सहाय्याने सपाटीकरण सुरू असताना फुटलेल्या जलवाहिनीतून वाहणारे पाणी.
जेसीबीच्या धक्क्याने जलवाहिनी फुटली
By admin | Published: November 30, 2015 11:07 PM