नाशिक : गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही जेईई मेन्स परीक्षा दोनदा घेतली जाणार असून, जेईईसह विविध तंत्रशिक्षण व वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक नॅशनल टेस्टिंग एजन्सी(एनटीए) तर्फे जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेशासाठी आवश्यक असलेली जेईई जानेवारी व एप्रिल महिन्यांमध्ये होणार आहे.यावर्षी एनटीएमार्फत संयुक्तकरीत्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. आयआयटी, एनआयटी यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी संस्थांत पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम (जेईई) मेन्स घेतली जाते.गतवर्षीप्रमाणे यंदाही ही परीक्षा दोनदा घेतली जाणार आहे. दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची सर्वोत्तम कामगिरी ग्राह्य धरली जाणार असून, ६ ते ११ जानेवारीदरम्यान होणाºया या परीक्षेसाठी आॅनलाइन नोंदणीची मुदत २ ते ३० सप्टेंबर असेल. ३ ते ९ एप्रिलदरम्यान होणाºया परीक्षेसाठी ७ फेब्रुवारी ते ७ मार्च आॅनलाइन अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. दरम्यान, एनटीएने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकात नोंदणीची मुदत, प्रवेशपत्र (अॅडमिट कार्ड) प्राप्त करण्याची मुदत व परीक्षेच्या दिनांकासह निकालाचा संभाव्य दिनांक नमूद केलेला आहे.यूजीसीची नेटही होणार दोनदायावर्षी यूजीसी- नॅशनल इलिजिब्लिटी टेस्ट (यूजीसी- नेट) ही स्पर्धा परीक्षाही संगणकाद्वारे घेतली जाणार असून, २ ते ६ डिसेंबरदरम्यान होणाºया या परीक्षेला प्रविष्ट होण्यासाठी ९ सप्टेंबर ते ९ आॅक्टोबरपर्यंत आॅनलाइन नोंदणी करावी लागेल. २१ डिसेंबरला निकाल जाहीर होईल. शैक्षणिक वर्षातील दुसरी यूजीसी- नेट परीक्षा १५ ते २० जूनदरम्यान होणार आहे. या परीक्षेसाठी १६ मार्च ते १६ एप्रिलदरम्यान नोंदणी करावी लागणार असून, ५ जुलैला या परीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार आहे.नीट लेखीस्वरूपातचसर्व प्रकारच्या वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमातील प्रथम वर्ष प्रवेशासाठी नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (नीट) परीक्षा घेतली जाणार असून ही परीक्षा लेखीस्वरूपात होणार आहे. या परीक्षेला प्रविष्ट होण्यासाठी २ ते ३१ डिसेंबरपर्यंत आॅनलाइन नोंदणी करण्याची मुदत असून, ३ मे रोजी नीट परीक्षा होणार असून, ४ जूनला निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
अभियांत्रिकीसाठी ६ ते ११ जानेवारीत जेईई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:44 AM