नाशिक : देशातील संविधान व लोकशाही वाचविण्यासाठी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (इव्हीएम) वर बंदी आणावी यासाठी बहुजन क्रांती मोर्चातर्फे मंगळवारी (दि.३०) ‘इव्हीएम हटाव, देश बचाओ’चा नारा देत अशोकस्तंभ परिसरात जेलभरो आंदोलन करण्यात आले.
केवळ इव्हीएमच्या माध्यमातून निवडणुका झाल्या तर त्या स्वतंत्र पारदर्शक होऊ शकत नाही. त्या करिता प्रत्येक इव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट मशीन जोडणे आवश्यक असल्याचा निकाल सर्वोच्या न्यायालयाने दिला आहे. परंतु व्हीव्हीपॅटमधील सर्व चिठ्यांची मोजणी करण्यास मात्र न्यायालयाने नकार दिला आहे. यावर सर्वोच्च न्यायालयात २३ राजकीय पक्षांनी याचिक दाखल केली होती. परंतु सुप्रिम कोर्टाने केवळ ५ टक्के व्हीव्हीपॅटमधील चिठ्या मोजण्यात येतील, असा निर्णय दिला आहे. मात्र यामूळे संपूर्ण पारदर्शकता येणे शक्य नसल्याचे सांगत बहुजन क्रांती मोर्चातर्फे इव्हीएम मशीन बंद करून बॅलेट पेपरवरच निवडणुका घ्याव्यात या मागणीसाठी मंगळवारी अशोकस्तंभ परिसरात जेलभरो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात अॅड. सुजाता चौदंते यांच्या नेतृत्वात राजीव खरे, संतोष वाघमारे, सचिन तोरणे, शरद साळवे, डॉ. विराज दाणी, संजय वाघ, अॅड. प्रदीप संसारे, वसंत महाले यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील नाशिकसह, धुळे, नंदुरबार, जळगाव व अहमदनगर जिल्ह्यातील बहुजन क्रांती मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी घेत ‘इव्हीएम हटाओ, देश बचाव’ची घोषणाबाजी केली. दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सरकार वाडा पोलीस ठाण्यात नेऊन कायदेशीररीत्या प्र्रतिबंधात्मक कारवाई केली.