नाशिक : जिद्दीने वाटचाल केल्यास काहीही अशक्य नाही आणि माणसाने ठरवले तर तो आत्मविश्वासातून जग जिंकू शकतो, असे धडे चिमुकल्यांनी आपल्या नाटकांतून दिले. राज्य बालनाट्य स्पर्धेत आज पाच नाटके सादर झाली. कृपा शैक्षणिक, बहुद्देशीय संस्थेच्या वतीने ‘सपान’ नाटकातून शेतकरी आत्महत्त्येनंतर त्या कुटुंबाची होणारी हेळसांड या विषयावर प्रकाश टाकण्यात आला. लेखन, दिग्दर्शन पूनम पाटील यांचे होते. प्रतीक गुंजाळ, सई मोराणकर, शिवम भालेराव, गायत्री जोशी, दुर्वाक्षी पाटील, नकुल चौधरी, हितेश पाटील, सुकन्या जगताप यांच्या भूमिका होत्या. जामखेडच्या लोकमान्य तरुण क्रीडा व सांस्कृतिक मंडळाने ‘थेंबांचे टपाल’ हे दुष्काळावर भाष्य करणारे नाटक सादर केले. यतिन माझिरे लिखित या नाटकाचे दिग्दर्शन तुषार काकडे यांनी केले. शिवराज राळेभात, निखिल देशमुख, रोनित खुबसे, सोहम बेलेकर, श्रद्धा जाधव, ऋत्विक बोराटे, अमृता उगले यांनी भूमिका केल्या. इगतपुरी येथील महात्मा गांधी हायस्कूलने ‘भूत, भविष्य, भुतावळ’ हे मुले व भुतांच्या मैत्रीवरचे धमाल नाटक पेश केले. त्यात रचना जगताप, श्रुती टिभे, सेजल चांडक, सिद्धी शिरसाठ, निधी गोहील, लक्ष्मी कासार, सानिका घुगे यांनी भूमिका साकारल्या. विवेक गरुड लिखित या नाटकाचे दिग्दर्शन अविनाश कुलकर्णी, सविता मौळे यांचे होते. जिद्दी, चिकाटी धरल्यास माणूस कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो, याचा प्रत्यय देणारे ‘हे तुम्हीही करू शकता’ हे नाटक भुसावळच्या महाराणा प्रताप विद्यालयाने सादर केले. समर्थ कुलकर्णी, प्रीतेश वरखेडे, वैष्णव गुरव, ऋषिकेष घोडके, योगेश अडगिल्लू, आदित्य पाठक, भूषण सोनसळे यांच्या भूमिका होत्या. नारायण पुंडलिक घोडके लिखित या नाटकाचे दिग्दर्शन पंकज साखरे यांनी केले.
जिद्द, आत्मविश्वासाचे धडे
By admin | Published: December 11, 2015 12:13 AM