सिन्नर (जि. नाशिक) (शैलेश कर्पे) : वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर वीज वितरण कंपनी व कर्मचाऱ्यांना शिव्यांची लाखोळी वाहणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांच्या टीकेला सिन्नर तालुक्यातील वावी-पाथरे वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याने आपल्या जिगरबाज कामगिरीने चोख उत्तर देऊन टीकाकारांची तोंड बंद केली आहे. वीज वितरण कंपनीच्या या कर्मचाऱ्याने जीवाची बाजी लावून बंधाऱ्यातून सुमारे १०० फूट लांब व २० फूट खोल पाण्यातून पोहत जाऊन वीजपुरवठा सुरळीत केल्याने त्याचे कौतुक होत आहे.
सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील वावी येथील ३३ केव्हीच्या वीज उपकेंद्राचा वीजपुरवठा सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास खंडित झाला. यामुळे सुमारे २८ गावांची वीज बंद झाली. सिन्नरचे उपकार्यकारी अभियंता ऋषीकेश खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अभियंता अजय सावळे, पाथरेचे सहायक अभियंता हर्षल मांडगे यांच्यासह वावी व पाथरे वीज उपकेंद्राचे ८ ते ९ वीज कर्मचाऱ्यांचे पथक ‘ फॉल्ट ’ शोधण्यासाठी वावीपासून पेट्रोलिंगला लागले. सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास गोंदे शिवारात एका बंधाऱ्यातील तीन विद्युत खांबावरील बंधाऱ्याच्या मधोमध असलेल्या खांबावरील जम्प तुटला असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सावळे, मांडगे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला. ज्या विद्युत खांबावर फॉल्ट होता तो खांब बंधाऱ्याच्या मधोमध सुमारे १०० फूट लांब होता. बंधाऱ्यात सुमारे २० फूट खोल पाणी होते. त्यामुळे या बंधाऱ्यात मधोमध असलेल्या खांबापर्यंत पोहचण्याचे दिव्य काम वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांसमोर होते. होडीची सोय नसल्याने पोहत जाऊनच काम करावे लागणार होते.
वावी-पाथरे वीज कक्ष कार्यालयातील कर्मचारी योगेश बापू वाघ याने पोहत जाऊन खांबावर चढून दुरुस्तीचे काम करण्यास तयार असल्याचे सांगितले. वाघ यांच्या पाठीला दोर बांधून व संरक्षक साधने घेऊन त्यांनी पाण्यात उडी घेतली. सुमारे १०० फूट पोहत जाऊन वाघ यांनी विद्युत खांब गाठला. त्यानंतर त्यावर चढून दुरुस्ती केली. सकाळी साडेअकरा वाजता सापडलेला फॉल्ट अडीच वाजेच्या सुमारास दुरुस्त करण्यात आला. वाघ यांच्यासह वीज वितरण कंपनीच्या ७ ते ८ कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावून विद्युत प्रवाह सुरळीत केल्यानंतर अडीच वाजेच्या सुमारास २८ गावांचा वीजपुरवठा सुरळीत सुरु झाला. दरवेळी वीज वितरण कंपनीवर टीका करणाऱ्या टीकाकारांना या योगेश वाघ यांनी चोख उत्तर देऊन गप्प केले.
‘वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर दरवेळी वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर टीका करण्यापेक्षा त्यांना समजून घेत जा. वीज वितरण कंपनीचे कर्मचारी ग्राहकांच्या आणि जनतेच्या सेवेसाठीच आहेत. आम्ही सहकार्य करतो जनतेने ही सहकार्य करावे.- अजय सावळे, सहायक अभियंता, वावी