सटाणा : ‘भाजी घ्या भाजी...’ अशा आरोळ्या देत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी लढविलेल्या क्लृप्त्या, शेतमाल विक्रीसाठी प्रत्येकाची अपेक्षित जागा पकडण्याची घाई... हे सर्व चित्र भाजी मंडईत नव्हे, तर येथील मविप्रच्या जिजामाता गर्ल्स हायस्कूलमध्ये बघावयास मिळाले. विद्यार्थिनींना शालेय शिक्षणाबरोबर व्यावहारिक ज्ञान मिळावे यासाठी शाळेत भाजीबाजार भरविण्यात आला होता. या बाजारात शेतकरी पाल्यांनी आपल्या शेतातील भाजीपाला विक्रीसाठी आणल्यामुळे शाळेत आठवडे बाजाराचे चित्र निर्माण झाले होते. स्थानिक बाजारात महागडा असलेला भाजीपाला शाळेतील बाजारात स्वस्त मिळत असल्याने नागरिकांनीही या बाजारात भाजीपाला खरेदी करण्याचा आनंद लुटला. विद्यार्थिनींना प्रत्यक्ष कृतीतून व्यावहारिक ज्ञान मिळावे या उद्देशाने जिजामाता विद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती एस. बी. मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती सी. झेड. गायकवाड व श्रीमती व्ही. ए. खैरनार यांनी विद्यार्थिनींसाठी शाळेत भाजीपाला बाजार उपक्रमाचे आयोजन केले होते. या बाजारातून विद्यार्थिनींना व्यावहारिक ज्ञानाबरोबरच बेरीज, वजाबाकी, नफा-तोटा प्रत्यक्ष अनुभवास मिळाला. या बाजारात जवळजवळ दहा ते पंधरा हजार रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती प्राचार्य श्रीमती मराठे यांनी सांगितले. सटाणा शहरात डेली भाजीपाला बाजाराबरोबर शनिवारी आठवडे बाजार भरतो. या बाजारापेक्षा शाळेतील बाजारातील भाज्या स्वस्त असल्याचे खरेदीसाठी आलेला पालक वर्ग सांगत होता. यावेळी उपमुख्याध्यापक पी. व्ही. सोनवणे, जे. बी. देवरे, एम. डी. पाटील, यू. पी. चव्हाण, आर. के. अहेर, एस. एस. सोनवणे, एस. बी. पाटील, ए. आर. सोनवणे, आर. डी. कापडणीस, जे. आर. पाटील, एस. के. जाधव, व्ही. एस. अहिरे, व्ही. एस. बच्छाव, यू. डी. गांगुर्डे, टी. बी. भदाणे आदींसह पालक, शिक्षक व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. शाळेच्या आवारात भरलेल्या या बाजारात कोणी कांदे, तर कोणी पपई, शेवग्याच्या शेंगा, चिंचा, बोरे, कोबी, तर कुणी मेथी, शेपू, कोबी, फ्लॉवर, बटाटे, कारली, वांगी, मिरच्या अशा विविध भाज्या व फळे विक्र ीसाठी आणली होती. काहींनी तर भेळ, पाणीपुरी, ओले हरभरे, पाववडा, बटाटेवड्याचे स्टॉल्स मांडले होते. भाज्यांचा योग्य भाव ठरवत त्यांचे योग्य वजन करून, पैसे मोजून घेताना विद्यार्थिनी दिसत होत्या. विविध खाद्यपदार्थ व भाजीपाला खरेदी करण्यासाठी पालक व नागरिकांनी गर्दी केली होती. पाच, दहा व पंधरा रुपयांत पावशेर भाजी मिळत असल्याने प्रत्येकाच्या चेहºयावर खरेदीचा उत्साह पहावयास मिळाला. बाजारपेठेत लक्ष ठेवत असताना शिक्षकांनाही खरेदीचा मोह आवरला नाही.
जिजामाता गर्ल्स हायस्कूलमध्ये भरला आठवडे बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 11:20 PM