नाशिक :नाशिकरोड-जेलरोड परिसरातील मुस्लीम समुदायाला दफनविधीसाठी गैरसोयीचा मोठा सामना करावा लागत होता. जेलरोड भागातून अंत्ययात्रा थेट देवळाली गाव किंवा जुने नाशिक परिसरातील कब्रस्तानमध्ये दफनविधीसाठी न्यावे लागत होते. दसक शिवारात पूलाजवळ जिलानी सुन्नी मुस्लीम कब्रस्तान सुरू करण्यात आले आहे. या कब्रस्तानामध्ये सोयीसुविधा महानगरपालिकेच्या वतीने उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यामुळे या समस्येचे निराकरण होण्यास मदत झाली आहे. नाशिकरोड, जेलरोड, नारायण बापू नगर परिसरतील मुस्लीम समुदायाची होणारी गैरसोय टळली आहे.महानगरपालिकेच्या वतीने संस्थेला बारा गुंठे क्षेत्र कब्रस्तानासाठी आरक्षित म्हणून देण्यात आले. या जागेचे संरक्षक कुंपण करुन त्या ठिकाणी आमदार बाळासाहेब सानप यांच्या निधीमधून जनाजा नमाजपठणासाठी सभागृही बांधण्यात आले आहे.
संस्थेने दफनविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना शुचिर्भूतची व्यवस्था म्हणून पाणी व धार्मिक शास्त्रीय पध्दतीने वजुखानाही लोकवर्गणीतून साकारला आहे. अंजुमन फैजाने हनफिया नुरीया ट्रस्टने या समस्येबाबत सातत्याने पाठपुरावा करून समस्या निकाली लावली आहे. कब्रस्तान दफनविधीसाठी कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष हाजी अब्दुलगणी शेख यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली.