नाशिक : मुंढेगाव जवळील जिंदाल कंपनीत सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास झालेल्या स्फोटात जखमी झालेल्या ९ रुग्णांना नाशिक मधील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यातील एकाचा मृत्यू झाला आहे. चार रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून चार रुग्णांचा धोका टळला असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
कंपनीत भीषण स्फोट झाला असून आग विझवण्यासाठी नाशिक येथील अग्निशमन दलाचे 7 मेगा बाऊजर बंब जिंदाल कारखान्यात दाखल. तसेच हायड्रोलीक शिडी असलेला बंब ही घटनास्थळी रवाना झाले आहेत. तसेच अंबड व सिन्नर एमआयडी सीतून अग्निशमन दलाचे बंब आले आहेत.
जिल्हा रुग्णालयातील २५ डॉक्टर , परिचारिकांच्या पथकाने उपचाराची तयारी केली असून जखमींवर उपचारासाठी वैद्यकीय पथक सज्ज आहे. जिंदल कंपनीतील स्फोटाची भीषणता लक्षात घेऊन डॉक्टर्स परिचारिका वॉर्ड बॉय आदी वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करून त्यांना जिल्हा रुग्णालयात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी दिली आहे.
आगीचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. महामार्गावरूनदेखील या आगीच्या धुराचे लोट दिसत आहेत. या कंपनीत एक हजारांहून अधिक कामगार आहेत. जिंदाल कंपनीत सद्य परिस्थितीत 40 अंबुलन्स आणि 12 अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. सुयश हॉस्पिटलमध्ये १५ रुग्ण दाखल झाले आहेत. पोलिस महानिरीक्षक डॉ. बी जी शेखर पाटील यांनी रुग्णाची भेट घेऊन चौकशी केली.