इंदिरानगर : साईनाथनगर चौफुलीलगत असलेल्या जॉगिंग ट्रॅकला वाहनतळाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे फेरफटका मारणाºया नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. साईनाथनगर चौफुली ते वडाळागाव चौफुलीदरम्यान महापालिकेने जॉगिंग ट्रॅक तयार केला आहे. या जॉगिंग ट्रॅकलगतच निलगिरीचे मोठ्या प्रमाणात वृक्ष असल्याने परिसराच्या सौंदर्यात भरच पडली आहे. शरीरासाठी चालणे हा व्यायाम महत्त्वाचा असल्याने विनयनगर, साईनाथनगर, वडाळागाव यांसह परिसरातून सकाळी आणि सायंकाळी मोठ्या प्रमाणात युवक-युवती व ज्येष्ठ नागरिक फेरफटका मारण्यासाठी येतात. साईनाथनगर चौफुलीलगतच जॉगिंग ट्रॅकसमोर परीक्षा केंद्र आहे. त्या ठिकाणी शनिवार, रविवार व सुटीच्या दिवशी विविध परीक्षा असतात. त्यामुळे महाराष्ट्रासह विविध राज्यांतून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वर्ग येथे येतो. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यासह विविध शहरांतून येणारे विद्यार्थी स्वत:चे वाहन आणतात. वाहनतळाची व्यवस्था अपुरी असल्याने वाहने सर्रासपणे जॉगिंग ट्रॅकमध्येच लावण्यात येतात. त्यामुळे येथे व्यायामासाठी येणाºया नागरिकांना अडथळा निर्माण होत आहे, तसेच येथे वाहनांचा वावर वाढल्याने ट्रॅकची अवस्था दयनीय होत चाललेली आहे. जॉगिंग ट्रॅक फेरफटका मारण्यासाठी आहे की वाहनतळासाठी, असा उपरोधीक प्रश्न त्रस्त नागरिकांनी केला आहे. संबंधितांनी येथे तातडीने लक्ष घालून कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
जॉगिंग ट्रॅक बनले वाहनतळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 12:26 AM