सातपूर : क्लब हाऊस येथील जॉगिंग ट्रॅक हा सातपूर विभागातील जॉगर्सप्रेमींसाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. या जॉगिंग ट्रॅकची आणि आजूबाजूची नियमित साफसफाई होत असली तरी या ठिकाणचे बहुतांश पथदीप बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे अंधार पडतो. आजूबाजूला मोठमोठे जंगली झाडी आणि गवत वाढलेले आहे. ट्रॅकवर नियमित पाणी मारले जात नसल्याने धूळ उडत असते. महापालिका प्रशासनाने लक्ष देऊन सोयीसुविधा पुरविण्याची मागणी जॉगर्सप्रेमींकडून केली जात आहे.
सातपूरगाव, सातपूर कॉलनी, समतानगर, श्रीकृष्णनगर, अशोकनगर, राज्यकर्मचारी वसाहत, जाधवसंकुल, श्रमिकनगर, सोमेश्वर कॉलनी, गणेशनगर, खांदवेनगर, सूर्यदर्शन कॉलनी, खोडे पार्क, स्वारबाबानगर आदी भागातील व्यायाम आणि जॉगर्सप्रेमींसाठी क्लब हाऊस येथील एकमेव जॉगिंग ट्रॅक वरदान ठरत आहे. हिवाळा सुरू झाल्याने नियमित जॉगर्ससह हौशी हंगामी जॉगर्सच्या संख्येत वाढ झाली आहे. या जॉगिंग ट्रॅकवर जॉगर्ससह मुली, महिला, ज्येष्ठ नागरिक सकाळी आणि सायंकाळी मोठ्या संख्येने व्यायामासाठी येत असतात. पाचशे मीटरचा हा ट्रॅक आहे. जॉगिंग ट्रॅकवर नियमित पाणी मारणे करणे अपेक्षित आहे. जॉगिंग ट्रॅकवर लहानमोठी खडी असल्याने ती धावपटूंना अडचणीचे ठरत आहे. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना दम लागल्यानंतर बसण्यासाठी बाके नसल्याने त्यांना विश्रांती कोठे आणि कशी घ्यावी, असा प्रश्न पडत आहे. जॉगिंग ट्रॅकच्या एका कोपऱ्याला ग्रीन जिमचे साहित्य बसविण्यात आलेले आहे, मात्र त्या ठिकाणी हिरवळ नसल्याने महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना व्यायाम करणे अवघड जात आहे. जॉगिंग ट्रॅकसाठी पथदीपांची व्यवस्था केली असली तरी काही पथदीप बंद अवस्थेत असल्याने अंधार पडतो. काही पथदीप उंच वाढलेल्या झाडांमध्ये असून नसल्यासारखे आहेत. जॉगर्स आणि व्यायामप्रेमींसाठी पाण्याची व्यवस्था केली असली तरी नळाला तोटी नसल्याने पाणी वाया जाते. जॉगिंग ट्रॅक नियमित साफसफाई केला जात असल्याने जॉगर्समध्ये उत्साह पहावयास मिळतो. महानगरपालिका प्रशासनाने या जॉगिंग ट्रॅकच्या विकासासाठी सोयीसुविधा पुरवाव्यात, अशी मागणी केली जात आहे.
इन्फो..
जॉगिंग ट्रॅक तयार झाल्यानंतर जॉगर्सप्रेमींनी जॉगर्स ग्रुप स्थापन केला आहे. या जॉगर्स ग्रुपने स्वखर्चाने जॉगिंग ट्रकच्या दुतर्फा मोठमोठी झाडे आणून लावलेली आहेत. काही झाडी स्थानिक लोकप्रतिनिधींनी लावलेली आहेत. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने हा जॉगिंग ट्रक व्यायामप्रेमींसाठी आणि जॉगर्सप्रेमींसाठी वरदान ठरत आहे. नवागतांसाठी हा जॉगिंग ट्रॅक आकर्षण ठरला आहे.
इन्फो..
जॉगिंग ट्रॅकवरील काही पथदीप बंद अवस्थेत असल्याने अंधार पडतो. या अंधाराचा फायदा घेऊन मद्यपी सर्रास या ठिकाणी महिला, तरुणी, ज्येष्ठ नागरिक यांच्या डोळ्यादेखत मद्यप्राशन करीत असल्याने जॉगर्सप्रेमींमध्ये नाराजीआहे. मद्यपींचा अड्डा झाल्याने महिलांना अडचणीचे ठरत आहे. या मद्यपींना वेळीच आवर घालावा, अशी मागणी होत आहे.
इन्फो...
जॉगिंग ट्रॅकच्या एका कोपऱ्याला घंटागाड्या थांबत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरते. शिवाय या ठिकाणी घंटागाडीतील कचऱ्याचे विलगीकरण केले जात असल्याने त्याचाही त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय घंटागाडीचे काही कर्मचारी झोपडी बांधून तेथेच राहत असल्याने त्यांचे साहित्य अस्ताव्यस्त पडलेले असते.
....
छायाचित्र आर फेाटोवर २३ सातपूर