नाशिक : ‘दिस चार झाले मन’, ‘अग्गोबाई ढग्गोबाई’, ‘दादला नको गं बाई’ या आणि अशा विविध लोकगीतांचे आणि लोकनृत्याचे सादरीकरण परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे मंगळवारी (दि. १) आर.एम. ग्रुप यांच्यातर्फे आयोजित सांस्कृतिक महोत्सवात करण्यात आले.‘रंग मराठ मोळा : आपली माणसं’ या कार्यक्रमात मंगळवारी विविध लोकनृत्य आणि लोकगीतांचे सादरीकरण कार्यक्रमाची सुरुवात राहुल थाटसिंगार आणि फारूक पिरजादे यांनी गायलेल्या ‘मोरया मोरया’ या गीताने झाली. प्रेक्षकांसाठी गीतांसह नृत्याचीही मेजवानी असलेल्या या कार्यक्रमात विविध लोकनृत्य सादर करताना लहानग्यांनी सादर केलेल्या ‘अग्गोबाई ढग्गोबाई’ या नृत्याने रसिकांची मने जिंकली. उत्तरोत्तर रंगत चाललेल्या या कार्यक्रमात जोगवा या चित्रपटातील ‘जीव रंगला’ या गीताने हा कार्यक्रम विशेष उंचीवर नेऊन ठेवला. या कार्यक्रमात ‘जिवा-शिवाची बैल जोड’, ‘सैराट झालं जी’, ‘चांग भल रं’, ‘खेळ मांडला’, ‘चल गं सखे पंढरीला’ या गीतांबरोबरच पारंपरिक मंगळागौर नृत्य तसेच आम्ही पारधी पारधी, लेजीम, आदिवासी लोकनृत्य, कोळी नृत्य सादर करण्यात आले. पोवाडा, जागरण गोंधळ, संबळ वादन आणि दिंडी नृत्यानेदेखील यावेळी लक्ष वेधले. आर. एम. ग्रुप यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात राहुल थाटसिंगार, फारूक पिरजादे, दीपक लोखंडे, सार्थक खैरनार, अॅना कांबळे, जितू देवरे, कांचन गोसावी आदींनी आपल्या स्वरांविष्काराने कार्यक्रमात विविध गीते सादर केली तर फारूक पिरजादे, पुष्कराज साळवे, श्रावण बोर्डे (ढोलकी), मनोज गुरव (बासरी), जयेश भालेराव (की बोर्ड) आणि अभिजीत शर्मा (आॅक्टोपॅड) यांनी साथसंगत केली. ‘रंग मराठ मोळा : आपली माणसं’ या कार्यक्रमाचे संगीतकार ध्रुवकुमार तेजाळे तर निर्मिती प्रकाश साळवे यांची होती. गेल्या दोन दिवसांपासून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची मंगळवारी मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी माजी महापौर अशोक दिवे, आरपीआयचे अध्यक्ष प्रकाश पगारे, चंद्रकांत जोशी, नाट्य परिषद नाशिक शाखेचे सुनील ढगे, चित्रपट महामंडळाचे श्याम लोंढे, तुषार भडांगे, शंकरराव बर्वे, नगरसेवक अॅड. श्याम बडोदे आणि महानगरपालिकेचे नगरसचिव ए. पी. वाघ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण मटकरी यांनी केले.
जिवा-शिवाची बैल जोड...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 1:01 AM