नाशिक : ओझर विमानतळाच्या हस्तांतरण प्रश्नी सार्वजनिक बांधकाम खात्याने टर्मिनल इमारतीत उपलब्ध करून दिलेल्या सुविधांची सद्यस्थिती व त्याची उपलब्धतता या दोन्ही गोष्टींची पुढच्या मंगळवारी सार्वजनिक बांधकाम खाते व एचएएलच्या अधिकाऱ्यांकडून संयुक्त पाहणी केल्यानंतर २८ फेब्रुवारी रोजी इमारतीचे अधिकृत हस्तांतरण करण्याचे आदेश अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. पी. एस. मीना यांनी दिले आहेत. रविवारी शासकीय विश्रामगृहावर मीना यांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम खाते व एचएएलच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक होऊन टर्मिनल इमारत हस्तांतरणात येणाऱ्या अडचणींवर चर्चा करण्यात आली. राज्य सरकारने एक रुपया नाममात्र दराने टर्मिनलची इमारत एचएएलकडे हस्तांतरण करण्याची तयारी दर्शविल्याने व मध्यंतरी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनीही त्यास सहमती दर्शविल्याने एचएएलच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत त्यास मंजुरी देण्याचे घाटले होते. परंतु त्यास विलंब होत असल्याचे पाहून स्थानिक पातळीवर एचएएल व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी अधिकृतरीत्या त्याचे हस्तांतरण करून देण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार आगामी तीन दिवसांत दोन्ही यंत्रणा स्वतंत्रपणे टर्मिनल इमारत व त्यासाठी पुरविण्यात आलेल्या यंत्रसामग्रीची सद्यस्थितीची पाहणी करून आपला अहवाल तयार करणार आहेत. त्यानंतर २४ फेब्रुवारी रोजी संयुक्त पाहणी करून आणखी काय सुविधांची पूर्तता करता येईल, याचा आढावा घेतील व त्यानंतर २८ रोजी अधिकृतरीत्या इमारत हस्तांतरण केल्याचा करार होणार आहे. सध्या चार महिने विमानतळाच्या सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकारची म्हणजेच गृहखात्याची असून, त्यानंतर केंद्रीय सुरक्षा बलाकडे ते हस्तांतरण करावे की, राज्याच्या गृहखात्याकडे वर्षभर ठेवावे याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
विमानतळ हस्तांतरण प्रकरणी संयुक्त पाहणी
By admin | Published: February 17, 2015 12:18 AM