नाशिक : ओझर रस्त्यावरील दहाव्या मैलाच्या अगोदर जऊळके दिंडोरी शिवारातील एका पुठ्ठयाच्या गुदामाला भीषण आग गुरूवारी (दि.१४) रात्री नऊ वाजेच्या सुमारास लागली. या आगीत गुदाम भस्मसात झाले. दोन तासानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाला यश आले.याबाबत अग्निशामक विभागाने दिलेली माहिती अशी, जऊळके शिवारात राजूशेठ संचेती यांच्या मालकीचे मालाचे गुदाम आहे. या गुदामाला रात्री नऊ वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागली. या आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही; मात्र वाऱ्याचा वेग अधिक असल्यामुळे क्षणार्धात गुदामाला लागलेली आग धुमसली. आगीच्या ज्वाला आणि धूराचे लोट आकाशात उंचच उंच उठत होते. त्यामुळे पिंपळगाव बसवंत, ओझर, दहावा मैल आदि भागातील नागरिकांना आग दिसत होती. घटनेची माहिती मिळताच ओझर, पिंपळगाव बसवंत, दहावा मैल येथील तीन बंब घटनास्थळी पोहचले. तसेच शहरातील शिंगाडा तलाव येथील अग्निशामक मुख्यालयातील एक मेगा बाऊजर, अग्निशामक विभागीय केंद्रातील एक बाउजर आणि नाशिकरोडी येथील एक बंब असे तीन बंब व जवान मदतकार्यासाठी घटनास्थळी पोहचले. रात्री नऊ वाजेच्या सुमारास लागलेली आग साडेदहा वाजेनंतर आटोक्यात आली. मुख्यालयातील लिडिंग फायरमन इकबाल शेख, वाहनचालक जगन्नाथ पोटिंदे, उदय शिर्के, मंगेश पिंपळे, अनिल गांगुर्डे यांच्यासह नाशिकरोड उपकेंद्रातील सुभाष निकम, बाजीराव कापसे, प्रकाश कर्डक, रामदास काळे, वाहनचालक राजेंद्र खर्जुळ आदिंनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यात सहभाग घेतला. रात्री अकरा वाजेपर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. या आगीत कुठल्याहीप्रकारे जीवीतहानी झाली नसली तरी मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही.
जऊळके दिंडोरी शिवारातील गुदामाला भीषण आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 10:48 PM
शिंगाडा तलाव येथील अग्निशामक मुख्यालयातील एक मेगा बाऊजर, अग्निशामक विभागीय केंद्रातील एक बाउजर आणि नाशिकरोडी येथील एक बंब असे तीन बंब व जवान मदतकार्यासाठी घटनास्थळी पोहचले.
ठळक मुद्दे वाऱ्याचा वेग अधिक असल्यामुळे क्षणार्धात आग धुमसली गुदामाला रात्री नऊ वाजेच्या सुमारास अचानकपणे आग