पंचवटी : महामार्गावरील वाहतूक कोंडी होऊन यासाठी बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलावरून केवळ चारचाकी व मालवाहू वाहनांना वाहतूक करण्यास परवानगी असली तरी दुचाकी व तीनचाकी वाहनधारकांकडून आता उड्डाणपुलाचा वाहतुकीसाठी सर्वाधिक वापर सुरू झाल्याने अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे वाहतूक शाखेने उड्डाणपुलावरून होणाऱ्या या दुचाकी वाहतुकीकडे साफ दुर्लक्ष केले आहे.वाघ महाविद्यालय ते द्वारकापर्यंत व तेथून पुढे असलेल्या उड्डाणपुलावरून दुचाकीचालक सर्रासपणे प्रवास करीत असल्याचे चित्र दैनंदिन असून, या उड्डाणपुलावरून दिवसभर चारचाकी, मालवाहू वाहने तसेच अवजड वाहनांची ये-जा सुरू असल्याने दुचाकी व चारचाकी वाहनात अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. दुचाकी तसेच चारचाकी वाहनात अपघात झाल्याची घटना घडून काही जण जखमी झालेले आहेत. या उड्डाणपुलावरून दुचाकी व तीनचाकी वाहनधारकांना वाहने नेण्यास मनाई आहे.उड्डाणपुलावरून चारचाकी वगळता दुचाकी तसेच रिक्षांना वाहतूक करण्यास मनाई असली तरी दुचाकी वाहनधारकांपाठोपाठ काही बेशिस्त रिक्षाचालक या उड्डाणपुलावरून प्रवासी वाहतूक करीत असतात. वाहतूक शाखेकडून अशा बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाई करणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.
उड्डाणपुलावरून सर्रास दुचाकीने प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2018 12:08 AM