- शफीक शेख/संजय पाठकमालेगाव : मालेगाव बाह्य मतदार संघातून दादा भुसे सलग चार वेळा विजयी झाले. त्यांचे वडील वडील स्वर्गीय दगडू बयाजी भुसे हे स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांचे कुटुंबिय शेतकरी परिवारातील होते. दादा भुसे यांचा जन्म ६ मार्च १९६४ रोजी झाला. त्यांचे माध्यमिक शिक्षण मालेगावातच झाले. त्यानंतर ते अभियंता झाले. त्यांनी डिप्लोमा इन सिव्हील इंजिनियरची पदविका मिळवली. त्यांनतर ते पाटबंधारे विभागात अभियंता म्हणून शासकीय सेवेत रुजू झाले. त्यांनी सुमारे १५ वर्षे त्यांनी शासकीय सेवा केली. त्यानंतर ते आनंद दिघे यांच्या संपर्कात आले. भुसे यांचेवर आनंद दिघे यांच्या कार्याचा प्रभाव असल्याने त्यांनी शासकीय सेवेचा राजीनामा देऊन सामाजिक कार्यात स्वत:ला झाेकून दिले. त्यांच्या पत्नी अनिता भुसे, मुले अजिंक्य आणि अविष्कार भुसे असा परिवार असून दोन्ही मुले शिवसेनेच्या माध्यमातून समाजसेवेत काम करीत आहेत. पत्नी अनिता भुसे महिलांसाठी सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत.
शासकीय सेवेचा राजीनामा दिल्यानंतर ते मालेगावी आले. शहरात जाणता राजा मित्रमंडळाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कार्यास प्रारंभ केला. रक्तदान शिबिरे घेतली. त्यामुळे मंत्री नसताना देखील त्यांच्या संपर्क कार्यालयात नेहमी दरबार भरलेला असे.त्यानंतर त्यांना शिवसेनेचे तालुका प्रमुख म्हणून काम केले. २००४ मध्ये पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवून दादा भुसे विजयी झाले त्यानंतर त्यांनी मागे वळून कधी पाहिलेच नाही. सलग चारवेळा त्यांनी विधानसभा निवडणुकीत विजयी होण्याचा विक्रम केला.
५ डिसेंबर २०१४ ते ९ जुलै २०१६ मध्ये त्यांना मंत्रिमंडळात प्रथम सहकार राज्यमंत्री पदाची संधी मिळाले. धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले. ९ जुलै २०१६ ते १२ १९ मध्ये ग्रामविकास राज्यमंत्री पदाची संधी मिळाली. त्यांनतर ५ जानेवारी २०२० पासून कॅबिनेट मंत्री पदी निवड झाली. कृषीमंत्री म्हणून कॅबिनेट मंत्री पदाचा कार्यभार पाहताना त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली. याच काळात त्यांनी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही काम केले.
नाशिक जिल्ह्यातून भाजपाला संधी नाही...
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात नाशिक भाजपाला संधी न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात उतर महाराष्ट्राला पाच मंत्री पद मिळाले आहेत नाशिक मधून शिवसेनेचे दादा भुसे आणि आमदार सुहास कांदे हे सर्वप्रथम फुटले होते. त्यापैकी दादा भुसे यांना मंत्री पद मिळाले आहे. मात्र, भाजपाचे पाच आमदार असूनही एकालाही संधी न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. नाशिक मधून आमदार देवयानी फरांदे, डॉ. राहुल आहेर सीमा हिरे आणि ऍड. राहुल ढिकले यांच्या नावाची प्रामुख्याने चर्चा होत होती मात्र, त्यापैकी एकालाही संधी मिळालेली नाही. उलट शिवसेनेचे दोन आमदार असून त्यातील एकला मंत्री पद मिळाल्याने त्यांना मंत्री मंडळात 50 टक्के संधी मिळाली आहे. नाशिक शहरात भाजपचे तीन आणि ग्रामीण मध्ये 2 असे पाच आमदार असून त्यापैकी एकालाही संधी मिळाली नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.