पंढरपूरची वारी ही खरी महाराष्ट्राची लोकसंस्कृती आहे. या वारीत खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन आपल्याला घडते. वारीचे रूप आपल्याला विराट आणि विस्तीर्ण दिसते. कारण महाराष्टतील खेड्यापाड्यांतून आणि वाडी-वस्त्यांमधून वारकरी या वारी सोहळ्यात सहभागी होतात. अनेक जण तन- मन-धनाने यात सामील होतात. महाराष्ट्रातील अनेक भागात त्या त्या भागातील संतांच्या पालख्यांसमवेत वारकऱ्यांच्या दिंड्या दरकोस दर मुक्काम चालत राहतात. आळंदीहून संत ज्ञानेश्वर माउलींची पालखी निघते, तर देहूहून संत तुकोबारायांची पालखी मार्गस्थ होते. त्र्यंबकहून संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ यांची पालखी येते. त्याचप्रमाणे संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज यांच्या पालख्या मराठवाडा, खान्देश, विदर्भ अशा दूरवरच्या भागातून पंढरीच्या दिशेने शेकडो मैल चालत राहतात. गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश अशा विविध प्रांतांमधूनदेखील वारकरी वाहनांमधून पंढरपुरात दाखल होतात. आंध्र प्रदेश आणि कर्नाटक प्रांताच्या सीमेवर महाराष्टतील हे तीर्थक्षेत्र अन्य भाषिक राज्यातील लोकांचे तीर्थस्थान आहे. किंबहुना पिढ्यान पिढ्यापासून ‘विठ्ठल’ हे त्यांचे दैवत आहे. पद्मपुराणात पंढरपूरचा अपूर्व महिमा गायला आहे. पंढरपूरची मूर्ती ही स्थापन केलेली नाही तर स्वयंभू आहे, असाही उल्लेख काही ग्रंथांमध्ये केलेला आढळतो.महत्त्वाची गोष्ट ही आहे की, पंढरपूरची वारी आणि वारकरी पंथ अनादी आहे. महाराष्टची संपूर्ण लोकसंस्कृती वारकरी संप्रदायात सामावलेली आहे. महाराष्टत आज अनेक पंथ, संप्रदाय आहेत, परंतु वारकरी संप्रदायाचा विस्तार अगदी खेड्यापाड्यात झालेला आहे. जुने जाणते लोक तर वारकरी संप्रदायात आहेतच, परंतु नवतरुणदेखील या वारकरी संप्रदायात सहभागी होत आहेत. याला एक कारण म्हणजे वारी होय. मी स्वत: वयाच्या १८ वर्षांपासून सहभागी होत आहे आणि त्याची अतिशय चांगली अनुभूती घेत आलो आहे.गेली ५० वर्षे मी पंढरीची वारी करीत आहे. वारीमध्ये आम्हाला खऱ्या अर्थाने राष्टय एकात्मतेचे दर्शन घडते. वारकरी संप्रदाय सर्व जाती, पंथ आणि धर्माचेदेखील संत होऊन गेले आहेत. वारकरी संप्रदायातील संतांनी नेहमी मानव कल्याणाचा आणि विश्वकल्याणाचा विचार मांडला आहे. तरुण कीर्तनकार, प्रवचनकार वारीमध्ये याच संतविचारांचा प्रचार आणि प्रसार करीत असतात.‘बैसू जिवे एके ठायी’ असे संत ज्ञानेश्वर माउली म्हणतात. प्रत्येकाची काया, वाचा, मती म्हणजेच शरीर, मन आणि बुद्धी यांची शुद्धी या वारीमुळे घडून येते. सध्याच्या काळात चंगळवाद वाढला आहे. परंतु वारीमध्ये सहभागी झालेला प्रत्येक वारकरी हा भौतिक सुखापासून दूर असतो. त्याला ओढ असते ती अध्यात्माची. त्यामुळे त्याच्या गरजा कमी असतात. प्रतिकूल परिस्थितीतही तो राहू शकतो. ऊन, वारा, पाऊस, थंडी याची पर्वा न करता शेकडो मैल अंतर चालत राहतो. पंढरीच्या वारीत सहभागी झालेला झोपडीतील गरीब माणूस आणि बंगल्यातील श्रीमंतदेखील येथे समान असतो.वारीमध्ये सहभागी झालेले भाविक खेड्यापाड्यातून आलेले असून अशिक्षित असले तरीही त्यांच्यात सर्व निती नियमांची जाणीव असते़ त्यामुळे वारीच्या नियमाचे ते पालन करतात़ पांडुरंगावर भाव ठेवून नियमितपणे ते वाटचाल करत राहतात़ त्याचवेळी ठिकठिकाणी दिंडीत सहभागी झालेले वारकरी हा संतांचा विचार ऐकत चालत राहतात. पंढरपूरनजीक वाखारी येथे सर्व संतांच्या पालख्या एकत्र जमतात, ‘संत सज्जनांचा जमला मेळा, अवघा रंग एक झाला’ असा तो अनुपम्य सोहळा असतो. वारकरी हा पंढरीकडे वाटचाल करतो म्हणजे तो केवळ वाट चालत नाही तर नवसमाजनिर्मितीची वाट दाखवितो, असे म्हणावे लागेल आणि हेच वारीचे संचित आहे.
डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर (लेखक संत साहित्याचे अभ्यासक आहेत.)