कसबे सुकेणे : प्रतिगाणगापूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या मौजे सुकेणे येथील दत्त महाराजांच्या यात्रोत्सवाला रंगपं-चमीपासून (दि.६) प्रारंभ होत आहे. सुमारे दोन लाख भाविक उत्सवात सहभागी होण्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला असून, दत्त मंदिर संस्थान आणि ग्रामपालिका प्रशासनाकडून यात्रेची जय्यत तयारी सुरू आहे. देशभरातील महानुभाव पंथियांचे प्रमुख चरणांकित स्थान असलेले मौजे सुकेणे येथील एकमुखी दत्त मंदिराच्या यात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. चार दिवसीय यात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळ-वारी (दि. ६) दत्त पालखी सोहळ्याने यात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. येथील यात्रोत्सव जिल्ह्यातील मोठा यात्रोत्सव म्हणून ओळखला जातो. राज्यभरातील लाखो महानुभाव पंथीय भाविक दर्शनासाठी येथे येतात. मौजे सुकेणे ग्रामपंचायतीच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली असून, ग्रामपंचायतीकडून यात्रेकरू भाविकांसाठी पाणी, विजेची व्यवस्था करण्यात येत आहे. बाणगंगा नदीपात्राची स्वच्छता करून तेथे रहाट पाळणे व व्यावसायिकांना जागा उपलब्ध करून देण्यात येत आहे, अशी माहिती वृषाली बाळासाहेब भंडारे, विराज पाटील, विलास गडाख व सदस्यांनी दिली. दत्त पालखी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, मंदिराला रंगरंगोटी, विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिरात भाविकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. जिल्ह्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन दत्त मंदिर संस्थानने केले आहे. बाणगंगा नदीपात्र, कसबे सुकेणे बसस्थानक परिसरात विविध व्यावसायिकांचे डेरे दाखल झाले असून, कसबे सुकेणेचा परिसर गजबजून गेला आहे.
मौजे सुकेणेत यात्रोत्सवाची जय्यत तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 12:12 AM