नाशिक : रक्षाबंधन म्हणजे भाऊ-बहिणीच्या अतुट नात्याला दृढ करणारा स्नेहाचा धागा होय. या सणाला प्रत्येक बहीण आपल्या लाडक्या भावाला राखी बांधते अन् भाऊदेखील बहिणीच्या या रेशमी धाग्याची आठवण ठेवत सदैव तिच्या रक्षणासाठी काळजी घेतो. परंतु यापलीकडे समाजात उपेक्षित आणि वंचित असलेल्या दोन घटकांचे काय? ‘त्यांना’ कोण राखी बांधणार आणि ‘त्यांच्या’कडून कोण राखी बांधून घेणार? समाजापासून दूर असलेल्या कारागृहातील बंदिजनांना उपेक्षित समजल्या जाणाऱ्या किन्नरांनी राख्या बांधून सामाजिक बांधीलकीचा मंत्र जपत जणू नवा आदर्श घालून दिला.रक्षाबंधन या सणाचे औचित्य साधून नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात जेलरोड येथील मंगलमुखी सेवाभावी ट्रस्टच्या वतीने किन्नर समाजातील लोकांनी बंदिजनांना राख्या बांधून आनंद द्विगुणित केला. ट्रस्टच्या अध्यक्ष पायल गुरुश्रीश्रीआणि त्यांच्या सहकारी शिला जाधव, संजना महाले, डॉली दोंदे, गौरी आदींनी कारागृहातील सुमारे ४० बंदिजनांना राख्या बांधल्या. कारागृहात गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम राबवित असल्याचे पायल गुरू यांनी सांगितले. परंतु यंदा मात्र या उपक्रमाला मोठा प्रतिसाद लाभला. ज्या हाताने कळत-नकळत गुन्हा घडला ते हात पुन्हा वाईट कामासाठी उठू नयेत, त्यासाठी आम्ही त्या हातावर राखी बांधली, अशी त्या मागची भावना असल्याचे पायल गुरुश्रीश्री यांनी सांगितले. तसेच जे केवळ घरापासूनच नव्हे तर समाजापासूनदेखील दूर लोटले गेले आहेत, अशा कैदी बांधवांचे आणि आमचे दु:ख सारखेच आहे. समाज आमचीदेखील उपेक्षा करतो. आमची हेटाळणी करतो. त्यामुळे आम्हाला या उपेक्षेच्या दु:खाची जाणीव आहे. याच भावनेने आम्ही गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागला. परंतु अखेर कारागृह प्रशासनाने आम्हाला या उपक्रमासाठी परवानगी दिली त्याबद्दल आम्ही कारागृह प्रमुख आणि प्रशासनाचे आभार मानतो. त्यामुळे कैद्यांच्या चेहºयावर समाधान दिसते. यामुळे आम्हालादेखील समाधान लाभते असे पायल गुरु म्हणाले.
कारागृहातील बंदिस्त जीवनात मिळाला सणाचा आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 1:09 AM