निसर्गरम्य अशा इगतपुरी तालुक्यात मागील महिन्यात अमली पदार्थांच्या सेवनासह रंगलेली हवाइयन रेव्ह पार्टी नाशिक ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून उधळून लावली होती. या कारवाईत बॉलिवूड, टीव्ही कलाकार व मालिकांमध्ये काम करणाऱ्या एकूण २२ तरुण-तरुणींकडून गांजा, हुक्का, चरस, कोकेन यांसारख्या मादक अमली पदार्थांचे सेवन केले जात असल्याचे आढळून आले होते. या गुन्ह्यात ड्रग्ज विक्री करणारा सराईत नायजेरियन गुन्हेगार पीटर उमाही पोलिसांच्या हाती लागला. बुधवारी हीना पांचाल, उमाही पीटर याच्यासह सर्व संशयितांना न्यायालयापुढे उभे करण्यात आले असता सुमारे तीन तास सुनावणी चालली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने सर्व संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. दरम्यान, संशयितांच्या वकिलांकडून न्यायालयात जामीन मिळावा यासाठी अर्ज करण्यात आला होता. या अर्जावर गुरुवारी आणि शनिवारी युक्तिवाद झाला. येत्या सोमवारी न्यायालयाकडून याबाबत निर्णय सुनावला जाणार आहे.
पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्य व मन:प्रभावित पदार्थ अधिनियम १९८५ नुसार (एनडीपीएस) गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून केला जात आहे.
बुधवारी
---इन्फो--
‘त्या’ दोघांचा लागेना थांगपत्ता
रेव्ह पार्टीसाठी ड्रग्ज पुरविणाऱ्या संशयित सराईत गुन्हेगार नायजेरियन उमाही पीटरच्या संपर्कातील दोन संशयित अद्यापही ग्रामीण पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यांच्या मागावर पोलिसांची पथके असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज कोठून आणि कसे मिळविले याचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे राहिले आहे. पीटर याच्याविरुद्ध यापूर्वीही काशिमीरा पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. तसेच त्याचा पासपोर्टही जप्त करण्यात आला आहे.