ओझर : जिल्ह्याच्या राजकारण सर्वाधिक सजग असलेल्या निफाड तालुक्याचे राजकारण अद्यापही भल्याभल्यांना उमगलेले नाही.त्यातच जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या बँकेच्या कार्यक्रमात आमदार दिलीप बनकर व माजी आमदार अनिल कदम एकत्र आल्याने पुन्हा एकदा वैचारिक जुगलबंदी तालुकावासीयांना बघावयास मिळाली.जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या बँकेच्या निफाड शाखेच्या नूतनीकरण समारंभास त्यांचे नेते अनिल कदम यांनी हजेरी लावली.सत्कार स्वीकारायच्या क्षणी आमदार दिलीप बनकर हे तेथे उपस्थित झाले.मग पूजा अर्चा करून क्षिरसागर यांनी दोघांचा सत्कार एकाच वेळी करण्याचे ठरवले.कट्टर राजकीय विरोधक असे दुसऱ्यांदा एकत्र आल्याने सर्वत्र चर्चा तर होणारच. नेमके झालेही तसेच कदमांनी सुरवातीला मुख्यमंत्री आमचे उद्धव ठाकरे असल्याने शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव मिळत आहे असे सांगितले त्यावर तेथे असलेल्या बाळू नानाने किंगमेकर शरद पवार असल्याचे सांगितले यावर एकच हशा पिकला.मध्ये नामदार आणि आजूबाजूला आजी माजी आमदार बसल्याने क्षीरसागर स्वभावाप्रमाणे शांतच बसून होते.कदमांनी लागलीच निसाका कधी सुरू करताय असे विचारले.त्यावर तो लवकरच होईल असे बनकर यांनी सांगितल्या बरोबर कदम यांनी निसाका बद्दल बोलतोय रासाका तर कुणीही घेईल त्यावर बनकर यांनी होणार चालू बघत राहा.रासाका अतिशय सोपा आहे सुरू करणे पण निसाका हा अवाढव्य असल्याने तो सुरू झाल्यास खऱ्या अर्थाने भारताचा कॅलिफोर्निया असलेला निफाड सहकारात पुन्हा झेंडा रोवेल असे उपस्थित म्हणत होते.मुख्य म्हणजे राज्यात सजग व बागायत तालुक्याचे दोन राजकीय विरोधक दुसऱ्यांदा एकत्र आले होते.खरे म्हणजे बँक नूतनीकरणच्या कार्यक्रमात तोंडी का होईना कारखाना सुद्धा नूतनीकरण होऊन त्यात लवकरच मोळी टाकू असे बनकर यांच्या बोलण्यातून जाणवल्याने तालुक्यातील जाणत्या शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहे.जंग अजून चार वर्षे चालणार आहे.त्यात आणखी किती पूर येतात हा मुख्य मुद्दा आहे.खरेम्हण्जे केवळ निवडणुकीत कट्टर विरोध दाखवायचा आणि तालुक्याच्या विकासात एकत्र आल्यास खरोखर राजकीय कलह दूर होण्यास मोठी मदत होईल शिवाय कार्यकर्त्यांना देखील योग्य संदेश जाईल.एरवी राजकीय कट्टरता योग्य पद्धतीने सांभाळणाऱ्या निफाड मध्ये शुभवर्तमान आल्याने सर्वांना आश्चर्य झाले असणार. त्यात योगायोगाने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुद्धा निफाडचेच असल्याने त्या निवडीत त्यांच्या विरोधात निवडणूक लढवलेल्या सुद्धा दिलीप बनकर यांच्या पत्नी मंदाकिनी बनकर होत्या.खरेतर अशा शुभप्रसंगी नेते एकत्र येऊन हसता खेळता विचार व्यक्त करू शकतात तर कार्यकर्त्यांनी कसला होरा मनात ठेवायचा असा थेट सवाल तालुक्यातील दुसऱ्या फळीतील नेत्यांमध्ये रंगून गेला आहे.