तुकाराम रोकडेदेवगांव : पूर्वी बैलांच्या व मानवाच्या मदतीने लाकडी घाण्यावर ऊसाचा रस काढण्याचा व्यवसाय ग्रामीण भागातील बाजारपेठेत होता. आज ग्रामीण बाजारपेठेतून लाकडी घाणे लुप्त होत असून यंत्राच्या सहाय्याने काढलेल्या ऊसाच्या रसाची चव देखील बदलली आहे.लाकडी घाण्यातील रस अतिशय शुद्ध चवदार असायचा. मात्र, यांत्रिक युगात मानवी व लाकडी घाण्याची जागा आता यंत्राने घेतली आहे.आता तर यंत्राच्या सहाय्याने काढलेला रस गल्लीबोळात पोहोचलेला आहे. मात्र, मानवी व लाकडी घाण्यावरून रसाचा स्वाद हा रस देऊ शकला नाही. त्यामुळे गरिबांच्या शीतपेयांची ती जुनी चव इतिहासजमा होत असल्याचे दिसून येत आहे.एकेकाळी ग्रामीण भागातील सर्वाधिक खपाचे शीतपेय म्हणून ओळखला जाणारा ऊसाचा रस बहुराष्ट्रीय शीतपेयांच्या आगमनाने मागे पडलेला दिसतो. विद्युत यंत्राच्या सहाय्याने लोखंडी यंत्रातून निघणाऱ्या ऊसाच्या रसापेक्षा लाकडाच्या घाण्यातून निघणारा ऊसाचा रस अधिक चवदार असल्याच्या प्रतिक्रिया आजही ग्रामीण भागात उमटतात. शहरी भाग व तालुक्यांच्या ठिकाणी प्रखर उन्हाळ्याच्या मोसमात रसवंत्या थाटल्या जातात. या सर्व रसवंत्यांमध्ये विद्युत मोटारीवर चालणाऱ्या लोखंडी यंत्रावरून ऊसाचा रस काढण्यात येतो.अतिशय कमी जागेत हे यंत्र बसविले जात असल्याने व्यावसायिकाला ते सोयीचे होत असते. या रसात बर्फ टाकल्याने ग्राहकांना थंड रस मिळतो. त्यात लिंबाचा समावेश असल्याने रसाच्या चवीत अधिक भर पडते. या रसाचे चलन शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात अधिक असते. थंड शीतपेयाच्या किमतीच्या तुलनेत रस पिणे अधिक परवडत असल्याचे ग्राहकांचे मत आहे.पूर्वी बैलांच्या किंवा मानवाच्या सहाय्याने लाकडी घाण्यातून निघणाऱ्या रसापासून ग्राहकांना जे समाधान मिळत होते ते समाधान यंत्राच्या सहाय्याने काढलेल्या ऊसाच्या रसातून मिळत नसले तरी आर्थिकदृष्ट्या तो परवडणारा असल्याचे सांगितले जाते. आता बैलांच्या किंमती वाढल्याने व बैल हाकणाऱ्या माणसाला मजुरी द्यावी लागत असल्यामुळे यातून सुटका मिळविण्यासाठी यंत्राचा वापर केला जातो. ते यंत्र शहरातील ग्रामीण बाजारपेठेत गल्ली बोळात फिरवताना रसविक्रेते दिसून येतात.सध्या काळाच्या ओघात लाकडी घाणा लुप्त होताना दिसत आहे. पूर्वी या घाण्यावर खुळखुळ्याचा वापर होत असायचा, यामुळे ग्राहकांना हे खुळखुळे आकर्षित करून ऊसाच्या रसाकडे येण्यास भाग पाडायचे. उन्हाळ्यात या ऊसाला प्रचंड प्रमाणात मागणी होत असायची. मात्र, आज वेगवेगळी शीतपेये बाजारात उपलब्ध होत असल्याने ऊसाच्या रसाची मागणी मागे पडू लागली आहे.
ग्रामीण भागातून रसाचा लाकडी घाणा कालबाह्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 11:54 PM
तुकाराम रोकडे देवगांव : पूर्वी बैलांच्या व मानवाच्या मदतीने लाकडी घाण्यावर ऊसाचा रस काढण्याचा व्यवसाय ग्रामीण भागातील बाजारपेठेत होता. ...
ठळक मुद्देयंत्राने घेतली जागा : चव बदलली