वणी : येथील ग्रामपालिका, नागरिक, प्रशासकीय यंत्रणा कोरोना योद्ध्यांचे काम करत असताना दुसरीकडे मात्र वाढत्या कोरोनाबाधितांच्या कोविड सेंटरमधील यंत्रसामुग्रीसाठी "मी वणीकर" या व्हॉट्सॲप ग्रुपने सामाजिक बांधिलकी जपत आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे.वणी गावातील नागरिक, व्यावसायिक, प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, शेतकरी, कष्टकरी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, उद्योजक, प्राध्यापक व्यापारी वर्ग समाजातील सर्व स्तरातून देणगीचा ओघ सुरू झाला आहे. उपलब्ध झालेल्या निधीची रक्कम नव्याने सुरू होत असलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या कोविड सेंटरमधे जम्बो ऑक्सिजन व्यवस्था अद्ययावत पद्धतीने कार्यान्वित होण्यास मदत होणार आहे .जगदंबा देवी ट्रस्ट व अनेक विविध क्षेत्रांतील देणगीदारांनी सढळ हाताने मानवतेच्या दृष्टिकोनातून संकटाच्या काळात आर्थिक हातभार लावल्याने कोविड सेंटरमधील २५ बेडच्या क्षमतेसाठी दोन ड्युरा ही ऑक्सिजन पुरवठ्याची सेवा कार्यान्वित होणार आहे.समाजोपयोगी कार्यासाठी सतीष जाधव, अंकित दोशी, बंटी सय्यद, तुषार देशमुख, गोविंद थोरात, अमोल भालेराव, गब्बर मनियार, बब्बू शेख व वणीकर ग्रुपच्या सदस्यांनी या सर्व सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या कार्यकर्त्यांनी निधी संकलनासाठी पाठपुरावा करत केवळ दोन दिवसांतच चांगली रक्कम उपलब्ध करून दिली.आयसोलेशन वॉर्ड सुरू करण्याची गरजयेत्या काही दिवसांत नवीन कोविड सेंटरमधे सदरची यंत्रसामुग्री कार्यान्वित होईल व बाधितांवर उपचार करणे सहज सुलभ होईल. दरम्यान, याबरोबर आयसोलेशन वॉर्ड सुरू होणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी सरपंच सुनीता भरसठ, उपसरपंच देवेंद्र गांगुर्डे, माजी उपसरपंच विलास कड, माजी सरपंच मनोज शर्मा यांनी पाठपुरावा करणे अपेक्षित आहे.
यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मदत होईल. शासकीय मुलींचे वसतिगृह यातून आयसोलेशनची व्यवस्था उभी करण्यासाठी इन्सिडंट कमांडर प्रांत अधिकारी संदीप आहेर, तहसीलदार पंकज पवार यांनी अग्रक्रमाने यात लक्ष घातल्यास या समस्येचे निराकारण होणेकामी मदत होईल.