सिन्नर : राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांसाठी बसभाड्यात ५० टक्के सवलतीसाठी स्मार्टकार्ड देण्याची योजना आणली आहे. या कार्डच्या माध्यमातून वर्षभरात ४ हजार किलोमीटर अंतराचा प्रवास सवलतीत करता येणार आहे. सिन्नर आगारामार्फत या योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून सात दिवसात ७२० अर्जांची आॅनलाईन नोंदणी करण्यात आली आहे.पास वितरण कक्षात केवळ एकाच संगणकावर ही नोंदणी प्रक्रिया करण्यात येत असून काहीशा वेळखाऊ असणाऱ्या या प्रक्रियेमुळे त्याठिकाणी तासनतास रांगेत उभे राहण्याची वेळ ज्येष्ठ नागरिकांवर ओढवली आहे. पास नोंदणी करताना बसण्यासाठी विशेष व्यवस्था न करण्यात आल्याने कक्षासमोर जत्रेचे स्वरूप बघायला मिळत आहे. जागा मिळेल तेथे मांड्या घालून ज्येष्ठ नागरिक बस्तान मारत असल्याचे चित्र पाहयाला मिळत आहेत. एसटीचा प्रवास कॅशलेस करण्यासह तो स्मार्ट करता येईल यासाठी घोषणा करण्यात आली होती. एसटीकडून प्रवाशांना देण्यात येणाºया मोफत व सवलतींच्या प्रवासासाठी यापुढे स्मार्टकार्ड सक्तीने देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात मोफत सवलत असणाºया घटकांना या कार्डचे वितरण देखील करण्यात आले आहे. एसटीच्या साध्या व निमआराम गाड्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत देण्यात येते. यासाठी आधारकार्ड असणारी जन्मतारीख ग्राह्य धरली जाते. मात्र ६५ वयाच्या आतील अनेकजण आधारकार्डवरील जन्मतारखेत बदल करून एसटीच्या योजनेचा फायदा लाटताना दिसतात. ज्येष्ठ नागरिक म्हणून मिरवणाºया या नकली प्रवाशांना रोखण्यासाठी दुसºया टप्प्यात स्मार्टकार्ड वितरीत करताना ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्यात आले आहे. मतदान, ओळखपत्र आधारकार्ड व आधारकार्डशी सलग्न असणारा मोबाईल क्रमांक या आधारे प्रत्येक आगार स्तरावर ही नोंदणी सुरू करण्यात आली आहे.
एसटीच्या स्मार्ट कार्डसाठी जेष्ठांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 6:24 PM