नाशिक - येथील कॉलेजरोडवरील किलबिल शाळेत ‘शॉपी डे’च्या नावाखाली प्रत्येक विद्यार्थ्याकडून २५० रुपये जमा करत शिक्षकांनी जंकफूडची विक्री केल्याची तक्रार पालकांनी महापालिका शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिका-यांकडे केल्यानंतर बुधवारी (दि.१४) पथकाने जाऊन शाळेची चौकशी केली आणि विद्यार्थ्यांचे जाबजबाब घेतले. याप्रकरणी शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावली असून गुरुवारपर्यंत खुलासा मागविण्यात आल्याची माहिती प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी दिली.नितीन उपासनी यांनी पत्रकारांना याबाबतची माहिती देताना सांगितले, कॉलेजरोडवरील किलबिल शाळेबाबतच पालकांच्या अनेक तक्रारी शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. शाळांमध्ये जंक फूडची विक्री करू नये, असे स्पष्ट परिपत्रक असतानाही किलबिल शाळेत ‘शॉपी डे’च्या नावाखाली शिक्षकांनी पिझ्झा, बर्गर यासारखे जंकफूड आणून विद्यार्थ्यांना विक्री केले. पालकांनी याबाबत तक्रार केल्यानंतर बुधवारी २५ जणांचे पथक जाऊन शाळेची तपासणी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांचेही जाबजबाब घेण्यात आले. सदर शाळेत ३ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांकडून घेण्यात आले पैसे परत करण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना करण्यात आल्या. याशिवाय, शाळेतील प्रवेशाबाबतही पालकांच्या तक्रारी होत्या. प्रवेश प्रक्रियेत विशिष्ट तारखेलाच जन्माला आलेल्या मुला-मुलींना प्रवेश देण्याचे धोरण राबविले गेले. मुळातच शाळेने वेळापत्रकापूर्वीच प्रवेश प्रक्रिया राबविली. त्यामुळे सध्या पालकांकडून प्रवेश अर्ज स्वीकारले जात नव्हते. त्याबाबतही गंभीर दखल घेण्यात आली. पालकांकडून प्रवेशासाठी अर्ज स्वीकारण्याच्या सूचना देण्यात आल्या तसेच लॉटरी पद्धतीने प्रवेश देण्याचेही सूचित करण्यात आल्याची माहिती उपासनी यांनी दिली. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचे भाऊ-बहिण किलबिल शाळेत अगोदरपासूनच शिक्षण घेत आहेत, त्यांना प्राधान्य देण्याचे सांगण्यात आले. शाळेसंबंधी प्राप्त तक्रारींबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचेही उपासनी यांनी सांगितले. दरम्यान, नाशिकरोड येथील आनंदऋषी शाळेसंबंधी प्राप्त तक्रारींचीही चौकशी करण्यात आली. सदर शाळेत मुलांना डबे उशिराने दिले जात असल्याची तक्रार होती. त्याबाबत जाब विचारण्यात आला. शिवाय, शाळेच्या मुख्याध्यापिका अवथनकर यांच्या पात्रतेसंबंधीचाही वाद असल्याने त्याचीही चौकशी सुरू असल्याचे उपासनी यांनी सांगितले.रुमालाने पुसायला लावले बेंचेसकिलबिल शाळेतील राखी नावाच्या शिक्षिकेने चौथी इयत्तेतील एका विद्यार्थ्याला शिक्षा म्हणून वर्गातील सर्व बेंचेस त्याच्या स्वत:च्या खिशातील रुमालाने पुसायला लावले. याशिवाय, सदर मुलाला सातत्याने टॉर्चर केले जात असल्याची तक्रार होती. त्यामुळे मुलाने आत्महत्येचीही धमकी दिलेली होती. या तक्रारीबाबतही गांभीर्याने घेत संबंधित शिक्षिकेवर तातडीने कारवाई करण्याची सूचनाही मुख्याध्यापकांना करण्यात आल्याची माहिती नितीन उपासनी यांनी दिली.
नाशिकच्या किलबिल शाळेत शिक्षकांकडून जंकफूडची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 1:26 PM
कारणे दाखवा नोटीस : पालकांच्या तक्रारीनंतर पथकामार्फत चौकशी
ठळक मुद्दे‘शॉपी डे’च्या नावाखाली प्रत्येक विद्यार्थ्याकडून २५० रुपये जमा करत शिक्षकांनी जंकफूडची विक्री केल्याची तक्रार प्रवेश प्रक्रियेत विशिष्ट तारखेलाच जन्माला आलेल्या मुला-मुलींना प्रवेश देण्याचे धोरण राबविले गेले