नायगाव : सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा येथील गौरी लहानू पवार यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याने त्यांचे सरपंचपद रद्द ठरविण्यात आले आहे. प्रथमच थेट जनतेतून मिळालेल्या सरपंचपदावरून अवघ्या चारच महिन्यात पायउतार होण्याची राज्यातील पहिलीच घटना असल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे. गत पंचवार्षिक निवडणुकीत आमदार वाजे गटाकडून थेट सरपंच म्हणून निवडून आलेल्या गौरी लहानू पवार यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेल्या वैयक्तिक माहितीतील सिटी सर्व्हे नंबर ४० मधील मालमत्ता क्र मांक ८९४ चे विटा, माती व सिमेंट पत्र्याचे २० बाय ३० फुटाचे घर शासकीय जागेवर अतिक्रमणात असल्याने पवार यांचे सदस्य व सरपंचपद ग्रामपंचायत अधिनियम १९५८चे कलम १४ नुसार रद्द ठरविण्यात आल्याचा निकाल जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी दिला आहे.आॅक्टोबर २०१७ मध्ये झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत माजी आमदार माणिकराव कोकाटे गटाचे आठ, तर आमदार वाजे गटाचे तीन सदस्य निवडून आले होते. मात्र थेट सरपंच म्हणून गौरी लहानू पवार यांनी कोकाटे गटाच्या कलाबाई काशीनाथ पवार यांना पराभूत करून थेट सरपंच होण्याचा मान मिळवला होता. मात्र शासकीय जागेवर अतिक्रमण करत घर बांधल्याची तक्रार कोकाटे गटाच्या कलाबाई पवार यांनी दाखल केल्याने अवघ्या चारच महिन्यात त्यांना पदावरून पायउतार व्हावे लागले.राज्यातील पहिली घटनाराज्यात प्रथमच थेट जनतेतून सरपंच निवडी निर्णय घेण्यात आला होता. थेट सरपंच होऊनही काही तांत्रिक कारणामुळे जनतेतून आलेल्या सरपंचाचे पद रिक्त होण्याची जिल्ह्यातीलच नाही तर राज्यातील ही पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या घटनेची चांगलीच चर्चा रंगत आहे. अवघ्या चारच महिन्यात गावात पुन्हा राजकीय हालचालीना वेग आला आहे. कोकाटे व वाजे गटाकडून सरपंच पदासाठी उमेदवारांच्या शोधमोहिमेसाठी कोपरा बैठकी सुरू झाल्याने ऐन उन्हाळ्यात वडगाव परिसरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.
अवघ्या चारच महिन्यांत सरपंचपदावरून पायउतार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 10:50 PM
नायगाव : सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा येथील गौरी लहानू पवार यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याने त्यांचे सरपंचपद रद्द ठरविण्यात आले आहे. प्रथमच थेट जनतेतून मिळालेल्या सरपंचपदावरून अवघ्या चारच महिन्यात पायउतार होण्याची राज्यातील पहिलीच घटना असल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.
ठळक मुद्देवडगाव पिंगळा : शासकीय जागेवर अतिक्रमण राजकीय वातावरण तापू लागले