नाशिक : हजारो शेतकरी प्रतीक्षेत असताना अवघ्या दीड महिन्यात उदिष्ट पूर्ण झाल्याने जिल्ह्यातील शासकीय खरेदी केंद्रांवरील मका आणि बाजरी खरेदीचे पोर्टल बंद करण्यात आले असून, ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी नोंदणी केली आहे त्यांचाही मका आणि बाजरी खरेदी होईल की नाही, याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. केंद्र शासनाच्या हमी भाव योजनेंतर्गत जिल्ह्यातील ९ तालुक्यांमध्ये मार्केटिंग फेडरेशनच्यावतीने खरेदी केंद्र सुरू करण्यात आली होती. या खरेदी केंद्रांवर हमी भावाने मका आणि बाजरीची खरेदी करण्यात येत होती. यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक होते. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रांवर नाव नोंदणी केलेली असतानाच बुधवारी सायंकाळपासून मका आणि बाजरी खरेदीचे पार्टल बंद करण्यात आले आहे. यामुळे शासकीय खरेदी केंद्रांवर माल विक्रीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांचा हिरमोड झाला असून, त्यांना खुल्या बाजारात कमी दरात मका विक्रीशिवाय पर्याय राहिला नाही. ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली; पण ज्यांचा माल अद्याप खरेदी करण्यात आला नाही त्यांच्याही मालाची आता खरेदी होईल की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. शासनाने अचानक पोर्टल बंद केल्यामुळे जिल्ह्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
चौकट -
जिल्ह्यातील नऊ खरेदी केंद्रांवर एकूण ९२४२ शेतकऱ्यांनी मका विक्रीसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ५१५० शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी आणण्याचा मेसेज पाठविण्यात आला होता. १८२३ शेतकऱ्यांनी आपला माल खरेदी केंद्रांवर आणला या सर्व मालाची खरेदी करण्यात आली असून, त्यापैकी ८३७ शेतकऱ्यांना मालाचे पैसे अदा करण्यात आले आहेत. बाजरी विक्रीसाठी ९२९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी केवळ १०५ शेतकऱ्यांच्या बाजरीची खरेदी करण्यात आली आहे.