नाशिक : महापौरपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचे जोरदार प्रयत्न सुरू असताना उमेदवारीसाठीदेखील स्पर्धा वाढली आहे. या पक्षाकडून सुधाकर बडगुजर, अजय बोरस्ते, सत्यभामा गाडेकर आणि विलास शिंदे हे चौघे प्रमुख इच्छुक असून, बुधवारी (दि.२०) याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.महापालिकेत भाजपनंतर शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक आहेत. ३४ नगरसेवकांना कॉँग्रेस, राष्टÑवादी, मनसे आणि भाजपमधील फुटीरांची साथ मिळाली, तर सत्तांतर होऊ शकते. त्यादृष्टीने शिवसेनेने स्थानिक पातळीवर महाशिव आघाडी तयार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. राज्यात सत्ता स्थापनेवरून भाजपशी संघर्ष सुरू झाल्यानंतर शिवसेनेने नाशिक महापालिकेसारख्या ठिकाणी भाजपला पायउतार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात लक्ष घातले आहे. नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपच्या विरोधात शिवसेनेने विलास शिंदे यांना पुरस्कृत करून प्रतिष्ठेचा प्रश्न केला. हे स्थानिक पातळीवरील बंड दाखवले गेले. त्यानंतर पक्षाने युतीधर्म पाळण्यासाठी दबाव आणून कारवाई करू नये यासाठी पक्षाचे ३६ नगरसेवक आणि साडेतीनशे पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. त्यानंतरदेखील विलास श्ािंदे यांचा पराभव झाला आणि भाजप सरस ठरली. ही नाचक्की दूर करण्यासाठी आता भाजपला सत्तेवरून खेचण्याचा चंग शिवसेनेने बांधला आहे. त्यामुळे नाशिकची निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली आहे.शिवसेनेच्या सर्वच इच्छुकांनी समीकरणे जुळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले असले तरी महाशिव आघाडीत येणारे किंवा भाजपकडून फुटणाऱ्यांचे समाधान कोण करू शकतात त्याचादेखील विचार केला जात आहे. त्यामुळे शिवसेनेत चौघा उमेदवारांमध्ये चुरस सुरू आहे. येत्या बुधवारी (दि.२०) अर्ज दाखल करण्याचा एकमेव दिवस असून, त्यादिवशी उमेदवारी घोषित केली जाण्याची शक्यता आहे.
शिवसेनेत उमेदवारीवरून रस्सीखेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 1:26 AM