लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : नेत्रहीन नागरिकांना आशेचा किरण दर्शविणारे चित्र गत दोन वर्षांपासून जिल्ह्यात दिसून येत आहे. ज्या अंध बांधवांना दृष्टिदानातून दृष्टी पुन्हा मिळू शकते, अशा अंधांना नावनोंदणीनंतर केवळ पाच ते सहा महिनेच प्रतीक्षा करावी लागत आहे. जिल्ह्यात नेत्रदानाच्या प्रमाणात वाढ होत असल्याने जिल्ह्यात केवळ १८८ रुग्ण सध्या वेटिंग लिस्टवर आहेत.
जिल्ह्यात कार्यरत असलेल्या आठ आय बँक आणि डोनेशन सेंटरच्या माध्यमातून वर्षाला सुमारे ३००हून अधिक शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. नेत्रदानाबाबत नागरिकांमध्ये सजगता निर्माण होण्यात वाढ होऊ लागली आहे. अनेक सुशिक्षित आणि सामाजिक भान असलेल्या व्यक्ती आधीच नेत्रदानाचा अर्ज भरून देतात, तर काही कुटुंबीय ज्येष्ठ नागरिकांच्या किंवा अपघातात ब्रेनडेड झालेल्या व्यक्तीच्या निधनानंतर तास-दोन तासात संबंधित आय बॅंक किंवा डोनेशन सेंटरशी संपर्क साधत असल्याने मृत्यूपश्चातदेखील नेत्रदान करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. गत दीड वर्षातील कोरोनाच्या बहराचा कालावधीवगळता अन्य काळातील ज्येष्ठांच्या सामान्य मृत्यूनंतर संबंधितांचे नेत्रदान केले गेले. त्यामुळेच वेटिंग लिस्टवर असलेल्या नेत्रहीनांची संख्या १८८वर पोहोचली आहे. संबंधित व्यक्तीच्या मृत्यूनंतर आय बँकेशी संपर्क साधल्यास त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात डोळे काढून घेण्याची प्रक्रिया पूर्ण होत असल्याने तसेच त्यानंतर मृत व्यक्तीच्या डोळ्यावर केवळ पट्टी बांधली जात असल्याने कुटुंबीयांनादेखील त्याचे फारसे वाईट वाटत नाही. मात्र, एका नेत्रहीनाला नेत्रदान करण्याचे समाधान लाभण्यासह त्याच्या डोळ्याने दुसरे कुणी जग पाहू शकण्याचे समाधान मिळते.
इन्फो
जिल्ह्यातील आठ केंद्रे कार्यरत
जिल्ह्यात नेत्रहीनांसाठी नेत्रदान करण्यासाठी आठ आय बँक आणि डोनेशन सेंटर्सना शासनाकडून मान्यता मिळालेली आहे. त्यात जिल्हा शासकीय रुग्णालय आणि एसएमबीटी रुग्णालयाचा डोनेशन सेंटरमध्ये समावेश आहे, तर डोनेशन आणि नेत्रप्रत्यारोपणासाठीच्या अधिकृत मान्यता केंद्रांमध्ये आडगाव मेडिकल कॉलेज, सुशील आय हॉस्पिटल, तुलसी आय हॉस्पिटल, श्री गुरुजी रुग्णालय, बापये रुग्णालय आणि मालेगावच्या रोटरी हॉस्पिटल यांचा समावेश आहे. त्याशिवाय नाशिकच्या बिर्ला आय हॉस्पिटलनेदेखील केंद्रासाठी अर्ज केला असून, त्यांना लवकरच सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे.
इन्फो
शस्त्रक्रिया यशस्वीतेचे प्रमाण ९० टक्क्यांवर
दोन दशकांपूर्वी जेव्हा नाशिकमध्ये नेत्रप्रत्यारोपण शस्त्रक्रियांना प्रारंभ झाला, त्यावेळी या शस्त्रक्रिया यशस्वी होण्याचे प्रमाण अवघे ६५ ते ७० टक्के होते. मात्र, तंत्रज्ञानातील बदलाने आता या नेत्रप्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया यशस्वी होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांवर जाऊन पोहाेचले आहे.
कोट
नेत्रदानाबाबत नागरिकांमध्ये खूप चांगल्या प्रमाणात प्रबोधन झाले आहे. त्यामुळे आता वेटिंग लिस्टवर प्रदीर्घ काळ राहण्याचे प्रमाणदेखील खूप कमी आहे. नावनोंदणीनंतर सुमारे सहा महिन्यात नेत्रप्रत्यारोपण होत असल्याने अनेक नेत्रहीनांना दृष्टी लाभत आहे. जिल्ह्यात दरवर्षी सुमारे तीनशेहून अधिक दृष्टिबाधितांना दृष्टी मिळते.
डॉ. शरद पाटील, सुशील आय हॉस्पिटल
कोट
गत वर्षभरात कोरोनाचा बहर काळवगळता अन्य काळात ७७ नागरिकांनी नेत्रदान केले असून, त्यातील ६९ नेत्र तांत्रिकदृष्ट्या योग्य असल्याने ६९ दृ्ष्टीहीन बांधवांना नेत्रदान करणे शक्य झाले. त्यामुळे जिल्ह्यात केवळ ९७ नागरिक वेटिंग लिस्टवर असून, सहा ते सात महिन्याहून अधिक प्रतीक्षा करावी लागत नाही.
डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक
-------------
जागतिक नेत्रदान दिन विशेष