नाशिक : (धनंजय रिसोडकर) नेत्रदानाद्वारे ज्यांना दृष्टी लाभणे शक्य असते अशा नेत्रहिनांसाठी नाशिक जिल्ह्यात कार्यरत असलेल्या आठ आय बॅँक आणि डोनेशन सेंटरच्या माध्यमातून दरवर्षी २५० ते ३०० नेत्रप्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्या जातात. अशा नेत्रहिनांनी नावनोंदणी केल्यानंतर त्यांना पूर्वी किमान २ ते ३ वर्ष थांबावे लागायचे. मात्र, गत काही वर्षांमध्ये नेत्रदानाचे प्रमाण समाधानकारकपणे वाढत असल्याने नाशिक जिल्ह्यात अशा अंध व्यक्तींना साधारणपणे तीन महिन्यांत नेत्र प्रत्यारोपण केले जाऊ लागले असून, जिल्ह्यात सध्या केवळ १७२ रुग्ण वेटिंग लिस्टवर आहेत.देशात नेत्रदानाचे प्रमाण समाधानकारक वाढत असल्याने दृष्टिहिनांना करावी लागणारी प्रतीक्षा आता बरीचशी कमी होऊ लागली आहे. विशेषत्वे मेट्रो शहरांमध्ये मृत्यूपश्चात नेत्रदानाचे प्रमाण खूपच चांगले झाले आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या मृत्यूनंतर त्यांचे कुटुंबीय सजगपणे नेत्रदानाचा निर्णय घेतात. त्यामुळे केंद्र शासनाने आय बॅँक असोसिएशन आॅफ इंडिया ही संस्था स्थापन केली असून, ज्या आय बॅँकेकडे पुरेसे नेत्र नसतील, त्यांनी या संस्थेकडे नोंदणी केल्यास त्यांना मोठ्या महानगरांतील अतिरिक्त नेत्रसाठ्यातून दोन-तीन महिन्यांत नेत्रपटलांचा पुरवठा केला जातो. त्यामुळे देशात कुठेही प्रदीर्घ काळ प्रतीक्षा करावी लागत नाही. देशात दरवर्षी साधारणपणे ८० हजारांच्या आसपास नेत्रांची गरज असते. त्या तुलनेत ४० ते ४५ हजार रुग्णांवर नेत्रशस्त्रक्रिया केले जात असल्याने त्यांना दृष्टी लाभते.---------------------------जिल्ह्यातील आठ केंद्रेनाशिक जिल्ह्यात आय डोनेशन किंवा नेत्रहिनांना दृष्टी लाभण्यासाठी शासनाकडून आठ केंद्रांना अधिकृत मान्यता मिळालेली आहे. त्यात आय डोनेशन सेंटर म्हणून जिल्हा शासकीय रुग्णालय आणि एसएमबीटी रुग्णालयाचा समावेश आहे, तर डोनेशन आणि शस्त्रक्रियांसाठी अधिकृत मान्यता मिळालेल्या केंद्रांमध्ये आडगाव मेडिकल कॉलेज, सुशील आय हॉस्पिटल, श्री गुरुजी रुग्णालय, तुलसी आय हॉस्पिटल, बापये हॉस्पिटल, मालेगावचे रोटरी हॉस्पिटल यांचा समावेश आहे. त्याशिवाय नाशिकच्या बिर्ला आय हॉस्पिटलनेदेखील केंद्रासाठी अर्ज केला असून, त्यांना लवकरच सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे.------------------------नेत्रहिनांवरील शस्त्रक्रियेच्या यशस्वीतेच्या प्रमाणात आता खूप वाढ झाली असून, आता हे प्रमाण ९० टक्क्यांच्या वर पोहोचले आहे. माझ्या हॉस्पिटलमध्ये दोन दशकांपूर्वी शस्त्रक्रिया सुरू झाल्या, त्यावेळी वर्षाला केवळ १० ते १२ नेत्रदान व्हायचे. आता माझ्या रुग्णालयातच वर्षभरात किमान नेत्रदानाच्या ७० ते ८० शस्त्रक्रिया पार पडतात.- डॉ. शरद पाटील,सुशील आय हॉस्पिटल
नेत्रप्रत्यारोपणासाठी आता केवळ तीन महिने प्रतीक्षा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2020 10:14 PM