नाशिक : गणरायाच्या आगमनामुळे मंगलमय झालेल्या वातावरणात भर घालणारा सण अर्थात गौरी पूजनाचा सोहळा आज मंगळवारी (दि.२९) घरोघरी होत आहे. भाद्रपद षष्ठीला अनुराधा व मूळ नक्षत्रावर सोनपावलांनी येणाºया या ज्येष्ठा-कनिष्ठा आपल्याबरोबर सख-समृद्धी, धन-धान्याची बरसात करतात. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी घरोघरी चैतन्य पहायला मिळत आहे. रात्री उशिरापर्यंत गौरींसाठी मनमोहक, कल्पक आरास करण्यात महिला मग्न होत्या. कुणाच्या घरी खड्याच्या, कुणाच्या घरी फोटोतील, कुणाच्या घरी मातीच्या मुखवट्याच्या, कुणाच्या घरी सुपारीच्या तर कुणाच्या घरी पितळी मुखवट्याच्या गौरी असतात. प्रथा-परंपरेनुसार त्यांची सजावट, त्यांची पूजा, त्यांचा नैवेद्य यांचे जंगी नियोजन घरोघरी पहायला मिळाले. ज्यांच्या घरी उभ्या गौरी आहेत, अशा महिलांनी आदल्या दिवशीच त्यांना नवकोरी साडी नेसविणे, दागिने घालणे, गौरींच्या आजूबाजूची सजावट, फळा-फुलांची आरास, लायटिंग, दिवे, फराळाच्या पदार्थांची मांडणी, हळदी-कुंकवाचे करंडे, साजशृंगार, वायनदान साहित्याची मांडणी आदी कामे करण्यावर भर दिला. गौरींच्या पाहुणचाराची तयारी करण्यात महिला गढून गेल्या होत्या.
आज होणार ‘ज्येष्ठा-कनिष्ठां’चे आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 1:46 AM