नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावरील बारीकसारीक घटनांवर सूक्ष्म लक्ष ठेवण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या ११० सूक्ष्म निरीक्षकांना निवडणूक कार्यालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दोन दिवसांपूर्वी सूक्ष्म निरीक्षकांसाठी आयोजित केलेल्या प्रशिक्षण कार्यशाळेला या सर्वांनी दांडी मारली होती. त्याबाबत त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला आहे.
जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या कक्षात घडणाºया प्रत्येक घटनेवर लक्ष ठेवून त्याच्या नोंदणी घेण्याची जबाबदारी या निरीक्षकांवर सोपविण्यात आली आहे. या निरीक्षकांचा अहवाल थेट निवडणूक आयोगालाच सादर करण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे सूक्ष्म निरीक्षक नेमताना शक्यतो ते राज्य सरकारच्या अखत्यारितील अधिकारी, कर्मचारी नको अशी भूमिका आयोगाची असल्याने जिल्ह्यात सुमारे ७०० निरीक्षकांची नेमणूक करताना निवडणूक कार्यालयाने राष्ट्रीयीकृत बॅँकांचे व्यवस्थापक, अधिकारी तसेच केंद्र सरकारच्या कार्यालयातील सेल्स टॅक्स, आयकर विभाग, वस्तू व सेवाकर विभागातील अधिकाऱ्यांची त्यासाठी निवड केली. या सूक्ष्म निरीक्षकांची निवडणुकीतील जबाबदारी समजावून सांगण्यासाठी दोन दिवसांपूर्वी कालिदास कलामंदिर येथे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. तशा सूचना सर्व निरीक्षकांना देण्यात आल्या होत्या. प्रत्यक्षात प्रशिक्षणाला ११० सूक्ष्म निरीक्षकांनी दांडी मारली. प्रशिक्षणस्थळी निवडणूक कार्यालयाने रजिष्टर ठेवले होते व त्याद्वारे सर्व उपस्थितांची हजेरी घेण्यात आली. त्यात ही बाब उघडकीस आली आहे. परिणामी निवडणूक कार्यालयाने सर्व अनुपस्थिताना लोकप्रतिनिधी कायद्यान्वये कारणे दाखवा नोटीस बजावली असून, त्यांच्याकडून लेखी खुलासा मागविला आहे.