नाशिक : किराणा घराण्याचे गायक पंडित कैवल्यकुमार गुरव यांनी नेहरू चौकातील पिंपळपारावरील पाडवा पहाटची मैफल यादगार केली. कैवल्यस्वरांनी हिरवागार पिंपळपार मोहरला आणि दर्दी नाशिककरही तृप्त झाले.पंडित संगमेश्वर आणि गणपतराव गुरव यांचा सांगीतिक वारसा लाभलेल्या कैवल्य यांनी राग ललतमध्ये जा रे जा रे बलमोरा या बंदिशीने मैफलीस प्रारंभ केला. त्यानंतर राग भुपेश्वरी पेश करत मैफलित रंग भरले. सूर चराचर छायो या निरंजनी भजनातही रसिक तल्लीन झाले. घेई छंद मकरंद ही रचना रसिकांना भावली. आयो प्रभात सब जन जागे ही बंदिश राग भिटयारमध्ये सादर केली. द्रुत लईतील व झपतालातील बंदिश विशेष दाद देऊन गेली. गुरव यांना साथसंगत नितीन वारे (तबला), सोनवणे (हार्मोनियम), विनोद कुलकर्णी व संस्कार जानोरकर (तानपुरा) यांनी केली. सूत्रसंचालन प्राजक्त व प्रफुल्ल लेले यांनी केले. याचवेळी अग्निशमन दलातील राष्ट्रपती पारितोषिक विजेते जवान दीपक गायकवाड, देवीदास इंगळे, शिवाजी खुळगे, हेमंत बेळगावकर, बाळासाहेब लहामगे, शिवाजी फुगट, अविनाश सोनवणे आणि अग्निशमन प्रमुख अनिल महाजन तसेच पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्कृती नाशिकचे अध्यक्ष व नगरसेवक शाहू खैरे यांनी स्वागत केले. यावेळी माहिती संचालक शिवाजी मानकर, दिल्लीतील ‘लोकमत’चे राजकीय संपादक सुरेश भटेवरा, नगरसेवक गुरमित बग्गा, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, कॉँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर आदी उपस्थित होते. यावेळी दिवंगत कलावंत प्रमोद भडकमकर आणि अरुण रहाणे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
कैवल्यस्वरांनी मोहरला पिंपळपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 12:04 AM