नाशिक : प्रख्यात कबड्डीपटू, राज्य किशोर संघाचे प्रशिक्षक आणि संघटक प्रशांत भाबड (५०) यांचे आजाराने निधन झाले. गत काही दिवसांपासून ते खासगी रुग्णालयात उपचार घेत असतानाच मध्यरात्री त्यांचे निधन झाले.
नाशिकचे राष्ट्रीयस्तरावरील माजी कबड्डीपटू म्हणून नावाजलेल्या भाबड यांनी नाशिकमध्ये कबड्डीचा खेळ जिवंत ठेवण्यात सर्वाधिक मोलाचे योगदान दिले होते. अनेक जिल्हा आणि राज्यस्तरीय कबडडी स्पर्धांच्या आयोजनात त्यांचा मोलाचा वाटा होता. तसेच नाशिकमध्ये भरविण्यात आलेल्या एनकेपीएल कबड्डी स्पर्धेमागील संकल्पना आणि नियोजनदेखील त्यांचेच होते. त्या माध्यमातून त्यांनी नाशिकच्या कबड्डीपटूंना राज्यस्तरावरील स्पर्धांचा अनुभव मिळवून दिला होता. राज्याच्या किशोरवयीन कबड्डी संघाचे प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी काम बघितले होते. गत दोन दशकांहून अधिक काळ ते नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या रुंगटा शाळेत क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत होते. नाशिकच्या क्रीडा क्षेत्रातील सर्व संघटनांशी त्यांचा निकटचा संबंध होता. नाशिक महोत्सवातील कबड्डी स्पर्धांसाठीदेखील त्यांनी अनेक वर्ष कष्ट घेतले. जिल्ह्यात हजारो कबड्डीपटू घडविण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते. स्वत: कबड्डीपटू असताना ज्या सुविधा मिळाल्या नाहीत, त्या सर्व सुविधा नाशिकच्या कबड्डीपटूंना मिळाव्यात, यासाठी त्यांनी अपार मेहनत घेतली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, भाऊ, भावजय असा परिवार आहे.
फोटो
२५भाबड प्रशांत