लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मालेगाव शहरात दिवसागणिक वाढणारा कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा व त्या प्रमाणात स्थानिक नागरिकांकडून मिळत नसलेला प्रतिसाद पाहता मालेगाव शहराशी असलेला दांडगा जनसंपर्क व खडान्खडा माहिती असलेले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक सुनील कडासने यांची खास मालेगाव शहरासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.मालेगाव शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४०५ इतकी पोहोचली आहे. अशा परिस्थितीत मालेगाव असंतोषाच्या उंबरठ्यावर उभे असल्याचा अहवाल गुप्तचर यंत्रणेने शासनास दिल्यामुळे शासनाची काळजी वाढली आहे. स्थानिक भागात त्यांना त्यांच्याच भाषेत कोरोनाची लक्षणे, धोके, घ्यावयाची काळजी याबाबत जागरूकता निर्माण करणे आवश्यक असून, ते काम करण्यासाठी शासनाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांची मालेगावच्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रमुखपदी नियुक्ती केली आहे.कडासने यांनी यापूर्वी सुमारे ४ वर्ष मालेगावी अपर अधीक्षक म्हणून काम केले असून, त्यांचे मालेगावच्या सर्वधर्मीय लोकांशी निकटचे संबंध आहेत. तसेच मालेगाव शहराची नस ते ओळखून असून, मराठीप्रमाणेच उर्दू भाषेवर त्यांचे प्रभुत्व आहे. मालेगावी असताना तेथील मशीद, मदरसा येथे त्यांनी मार्गदर्शन केले आहे. तेथील जनतेनेही त्यांना चांगले सहकार्य केले असल्याने कोरोनाच्या काळात स्थानिक नागरिकांनी शासनाच्या प्रयत्नांना साथ द्यावी त्यासाठी त्याचे मन वळविण्याचे काम कडासने यांच्यावर सोपविण्यात आले आहे.---------------------------------शरद पवारांनी घातले लक्षराज्यात मोठ्या शहरांपाठोपाठ मालेगाव शहर कोरोनाचे मोठे केंद्र होत असल्याचे पाहून शरद पवार यांनी यात लक्ष घातले असून, मिळालेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी पवार यांनी गुप्तचर यंत्रणा व कडासने यांच्याकडून मालेगाव शहराची परिस्थिती जाणून घेतली. त्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची त्यांनी तज्ज्ञ मंडळींकडून माहिती करून घेतली, त्यातूनच कडासने यांची मालेगावसाठी नेमणूक करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
मालेगावची जबाबदारी कडासने यांच्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2020 8:53 PM