लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : १९९५ पासून अपंगांसाठी लागू करण्यात आलेल्या पुनर्वसन कायद्याची न झालेली अंमलबजावणी आणि ३ टक्के राखीव निधी खर्चाबाबत उदासीनता याप्रश्नी अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारल्यानंतर महापालिकेकडून आता अपंगांसाठी केलेली कामे दाखविण्यासाठी सारवासारव चालविली आहे. चार वर्षांपूर्वी महापालिकेने अपंगांचे केलेले सर्वेक्षणही कागदावरच राहिले असून, त्यांच्यासाठी केलेल्या कामांची यादी महापालिका प्रशासन सादर करू शकलेली नाही. त्यामुळे, अपंगांप्रश्नी मनपाने केलेले दावे पोकळ असल्याचे चित्र दिसून येत आहे. आमदार बच्चू कडू यांनी आयुक्तांवर हात उगारल्यानंतर त्यांच्या कृतीचा सर्वस्तरातून निषेध नोंदविण्यात आला. परंतु, दुसरीकडे कडू यांनी अपंगांसंबंधी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे मात्र अनुत्तरीतच आहेत. कडू यांच्या दणक्यानंतर महापालिकेने अपंगांसंबंधी केलेल्या कामांची माहिती प्रसिद्धीपत्रकान्वये जाहीर केली असली तरी त्याद्वारे ठोस कोणताही कृती कार्यक्रम राबविला गेला नसल्याचे अधोरेखित झाले आहे. महापालिकेने सर्वशिक्षा अभियानांतर्गत सर्व शाळांमधील अपंग विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केल्याचा दावा केला आहे. पुन्हा करणार सर्वेक्षणमहापालिकेने २०१३ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात ५०८ अपंग आढळून आल्याचे म्हटले आहे. वास्तविक ही संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. मनपाच्या सर्वेक्षणात आढळून आलेल्या या ५०८ अपंग बांधवांसाठी मनपाने कोणते प्रकल्प राबविले याचीही माहिती महापालिकेकडे उपलब्ध नाही. त्यामुळे चार वर्षांपासून सर्वेक्षण कागदावरच राहिलेले आहे. आता वैद्यकीय विभागामार्फत सर्वेक्षण करण्याचा निर्णय मनपाने घेतला असून, अपंग बांधवांनी त्यांचे निवासी क्षेत्रातील मनपाच्या विभागीय कार्यालयात संपर्क साधून नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
कडूंच्या दणक्यानंतर पालिकेची सारवासारव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 12:50 AM